३३ कोटी वृक्षलागवडीच्या भ्रष्टाचाराची चौकशी लागल्याने मुनगंटीवार डिस्टर्ब झालेत...

राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी 16 आमदारांची विधिमंडळ समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत भाजपचे चार आमदार आहेत. ही समिती चार महिन्यांच्या आत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करणार आहे.
Nana Patole - Sudhir Mungantwar
Nana Patole - Sudhir Mungantwar

भंडारा : एकानंतर एक जनहितविरोधी निर्णय घेत असल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आता फार काळ टिकणार नाही, असे वक्तव्य माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काल नागपुरात केले होते. ३३ कोटी वृक्षलागवडीत त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सरकारने सुरू केल्यामुळे मुनगंटीवार डिस्टर्ब झालेले आहेत. त्यामुळेच ते बेताल वक्तव्य करीत असल्याचे सांगत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आज यांनी त्यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.   

राज्यातील 33 कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी 16 आमदारांची विधिमंडळ समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत भाजपचे चार आमदार आहेत. ही समिती चार महिन्यांच्या आत वृक्ष लागवड मोहिमेची चौकशी करून सभागृहाला अहवाल सादर करणार आहे. ही चौकशी सुरू करून मुनगंटीवार यांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याने ते डिस्टर्ब झाले आहेत. फडणवीस सरकारने 2014 ते 2019 या कालावधीत 33 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम राबविली होती. या मोहिमेवर किती खर्च झाला व वृक्ष लागवडीनंतर किती झाडांचे संगोपन झाले. यासंदर्भात शिवसेनेचे भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांनी मागील आठवड्यात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हापासूनच भाजपचे नेते बिथरले असल्याचेही नाना म्हणाले. 

या मोहिमे अंतर्गत वन विभागाने 28 कोटी वृक्षांची लागवड केली. त्यातील 75 टक्के रोपे सध्या जिवंत असून 25 टक्के रोपे नष्ट झाल्याचे सरकारने विधीमंडळात मान्य केले होते. राज्यातील अनेक भागांतील रोपे नष्ट झाली आहेत. जी झाडे आहेत, त्याची व्यवस्थित देखभाल व संगोपन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वृक्ष लागवड मोहिमेवर 2500 कोटी रुपये खर्च करूनही झाडे जळत असतील तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेत आमदारांनी केलेली आहे.  

आमदार, मंत्री कोरोनाबाधित असल्याने निवडणूक पुढे ढकलली...
नाना म्हणाले, भाजपचे नेते आजकाल फार डिस्टर्ब आहेत. ज्या गोष्टी आज सगळ्यांना कळतात, त्या त्यांना का कळत नाहीत. हा प्रश्‍न मुनगंटीवारांच्या या वक्तव्याने पुन्हा उपस्थित झाला आहे. भाजपचे काही आमदार कोरोनाने बाधित आहेत. सत्तापक्षाचेही काही आमदार आणि मंत्री कोरोनाबाधित आहेत. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होते आणि त्यासाठी आमदारांचे मतदान होते. आता ही कोरोनाबाधित मंडळी मतदानाला हजर राहू शकत नाही, हे विरोधी पक्षालासुद्धा माहिती आहे. पण मूळ प्रश्‍नांना बगल देण्यासाठी त्यांच्याकडून असे फालतूचे मुद्दे उपस्थित केले जातात. डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सामान्य लोकांचे जगणे मुश्‍कील होऊन बसले आहे. गोडेतेल आज २१०० रुपयांच्या वर जाऊन पोचले आहे, जे की आधी १००० ते १२०० रुपयांना मिळायचे. हे मुद्दे कुणी उपस्थित करू नये म्हणून भाजपच्या मंडळीकडून अशा फालतुच्या गोष्टी केल्या जातात. आमच्या सरकारजवळ १७१ आमदारांचं बहुमत आहे. अध्यक्षाच्या निवडीसाठी १४५ आमदार लागतात आणि अशाही स्थितीत मुनगंटीवारांसारख्या नेत्यांनी अशी वक्तव्ये करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com