munde refuses extension of contract engineers engineers to go to chief minister | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

कंत्राटी अभियंत्यांच्या मुदतवाढीस मुंढेंचा नकार, मुख्यमंत्र्यांकडे जाणार अभियंते 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 2 जून 2020

शहरात सिमेंट रस्ता टप्पा तीनच्या कामांसाठी झोनस्तरावर कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली होती. महापालिकेने दहाही झोनमध्ये एकूण 60 कंत्राटी अभियंत्यांना सहा महिन्यांसाठी नियुक्त केले होते. यातील 56 जणांचा करार 28 मे रोजी संपुष्टात आला.

नागपूर : महापालिकेने सिमेंट रस्त्यांच्या कामासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या अभियंत्यांना काढून टाकले होते. आज या अभियंत्यांनी महापालिकेत पुढील सहा महिने मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना स्पष्ट नकार दिल्याने त्यांची निराशा झाली. आता मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे एका अभियंत्याने सांगितले. 

शहरात सिमेंट रस्ता टप्पा तीनच्या कामांसाठी झोनस्तरावर कंत्राटी अभियंत्यांची नियुक्ती केली होती. महापालिकेने दहाही झोनमध्ये एकूण 60 कंत्राटी अभियंत्यांना सहा महिन्यांसाठी नियुक्त केले होते. यातील 56 जणांचा करार 28 मे रोजी संपुष्टात आला. इतर चार जणांच्या कंत्राटाचा करार अद्याप शिल्लक असल्याने ते कायम आहेत. आयुक्त मुंढे यांनी कंत्राट संपुष्टात येताच या अभियंत्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात या तरुण अभियंत्यांवर बेकारीचे संकट कोसळले. 

कोरोनाच्या काळात नवीन नोकरी मिळणार नाही. त्यामुळे पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीसह 56 अभियंते आज आयुक्तांच्या दारात पोहोचले. या अभियंत्यांनी आयुक्तांना विनंती केली. परंतु आयुक्तांनी सिमेंट रोडची कामे बंद आहेत. महापालिकेकडे पैशाची चणचण आहे. अशा स्थितीत कंत्राटी अभियंत्यांवर होणारा खर्च झेपणारा नाही, असे सांगितले. त्यामुळे या तरुणांची निराशा झाली. आयुक्तांनी कार्यमुक्त केल्याचे कारणही दिले नाही. 

मुंबईप्रमाणे तोडगा काढण्याची मागणी 
मुंबई महापालिकेनेही अशाच पद्धतीने कंत्राटी अभियंत्यांना अचानक कामावरून कमी केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून त्यांना पुन्हा कामावर घेतले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असून मुंबई महापालिकेप्रमाणे तोडगा काढण्याची विनंती त्यांना करण्यात येईल, असेही एका अभियंत्याने नमुद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख