एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी केली फडणवीसांना ‘ही’ विनंती - mpsc candidates made this request to fadanvis | Politics Marathi News - Sarkarnama

एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांनी केली फडणवीसांना ‘ही’ विनंती

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

कालच्या आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, ते सरकारने मागे घ्यावे. कारण हा विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्‍न आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे हित आहे, तोच निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा

नागपूर : राज्य सरकारने काल एमपीएससीच्या परीक्षेची तारीख पुढे ढकलली होती. त्यानंतर परीक्षार्थ्यांनी राज्यभर आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यानंतर परीक्षेची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. ती येत्या २१ मार्चला ही परीक्षा होणार आहे. आज एमपीएससीचे परीक्षार्थी आणि वर्ग घेणाऱ्या शिक्षकांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली असल्याची माहिती आमदार प्रवीण दटके यांनी दिली.

आमदार दटके म्हणाले, विदर्भातील स्पर्धा परीक्षांचे शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या मागण्यांबाबत आता आग्रही आहेत. २१ मार्चला केंद्र सरकारची एक परीक्षा आहे, २८ मार्चला दुसरी आणि ११ एप्रिलला कम्बाईनची परीक्षा आहे. अशा परिस्थितीत सरकारने आज १४ मार्चची रद्द केलेली एसपीएससीची परीक्षा २१ मार्चला ठेवली आहे. ज्या विद्यार्थ्यांना २१ तारखेची केंद्राची परीक्षा द्यायची आहे, त्यांचा एक पेपर चुकण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी ज्यांच्या परीक्षा झाल्या, मुलाखती झाल्या त्यांना अद्यापही पोस्टींग दिल्या गेल्या नाही. याआधी आरोग्य विभागाची परीक्षा झाली, त्यामध्ये झालेला घोटाळा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्यावर काय होते, हे येणारा काळच सांगेल.

ज्या विषयांवर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्याच मुद्यांवर सरकारने काम केले पाहिजे. या विषयात आम्हाला राजकारण करायचे नाही. पण कालच्या आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत, ते सरकारने मागे घ्यावे. कारण हा विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्‍न आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे हित आहे, तोच निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशीच आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत सांगावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचेही आमदार दटके म्हणाले. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या परीक्षा राज्याचे प्रशासन घेऊ शकते, तर राज्यानेच आयोजित केलेली परीक्षा का नाही घेऊ शकत, असाही सवाल दटकेंनी उपस्थित केला. 

नागपुरातील लॉकडाऊन फसवे
या कडक लॉकडाऊनला आमचा पूर्ण विरोध आहे. कारण २५ टक्के उपस्थितीसह सरकारी कार्यालये सुरू राहणार, कॉटन मार्केट सुरू राहणार, ऑनलाइन दारू विक्री सुरू राहणार, भाजीपाला, किराणा, औषधी दुकाने सुरू राहणार, ट्रान्सपोर्ट सुरू राहणार, पेपर विक्री, ऑनलाइन जेवण मागविणेही सुरू राहणार. मग बंद काय राहणार आहे? ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्या बाबतीत काय करणार? सरकार त्यांच्या घरी जेवण पोहोचवून देणार आहे का, असे प्रश्‍न उपस्थित करून हे लॉकडाऊन फसवे असल्याचा आरोप आमदार दटकेंनी केला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख