खासदार नवनीत राणा म्हणाल्या, हे अडसुळांचे षड्यंत्र; सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार... - mp navnit rana said this is a conspiracy of adsul will go to supreme court | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार नवनीत राणा म्हणाल्या, हे अडसुळांचे षड्यंत्र; सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार...

अरुण जोशी
मंगळवार, 8 जून 2021

अमरावती जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन केवळ एक महिला आहे म्हणून मला त्रास देण्याचे, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे व माझे खच्चीकरण करण्याचे काम केलेले आहे.

अमरावती : मुंबई उच्च न्यायालयाने Mumbai High Court आज जो निकाल दिला. त्याची प्रत अद्याप मला मिळालेली नाही. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर करते Fully respects the decision of the High Court आणि निकालाची प्रत मिळाल्यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. तेथे सत्याचाच विजय होईल, असा विश्‍वास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा MP Navnit Rana यांनी आज व्यक्त केला. 

खासदार राणा म्हणाल्या, आज आलेल्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. माननीय न्यायालयाने या निकालास ६ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्या असल्यामुळे माझ्या वकिलांच्या मागणीचा न्यायालयाने विचार केला आहे. या आधी सर्वोच्च न्यायालयाचे अधीन असणाऱ्या जातपडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र तीन वेळा पूर्ण छाननी करून वैध असल्याचा अहवाल सादर केला होता. माननीय उच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे. त्याचा आदर करून घटनादत्त अधिकाराचा पूर्ण वापर करून माझी सत्य भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार आहे. 

न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिला कायदेशीर दृष्ट्य़ा पूर्ण मान्यता व अधिकार आहेत, अशा न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली व या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जातपडताळणी समितीने माझे जात पडताळणी प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा याआधी तीन वेळा दिला आहे. आजच्या निकालाचा संपूर्ण सन्मान करून कुठल्याही पद्धतीने विचलित न होता न्यायदेवतेवर संपूर्ण पणे विश्वास ठेवून आपली बाजू सत्य आहे, असे खासदार राणा म्हणाल्या. 

उच्च न्यायालयाच्या आदेशाची  प्रत अजून आपल्याला मिळालेली नाही. न्यायमूर्तींनी काय निर्वाळा दिला, हे अजून विस्तृतपणे आपण वाचलेले नाही. निकालाची प्रत मिळाल्यानंतर आपण या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. माझे वकील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. ढाकेपालकर व ॲड. गाडे यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ८ आठवड्याचा वेळ मागितला होता. कारण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्या सुरू आहेत. माननीय न्यायमूर्तींनी त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून या निकालाला ६ आठवड्यांची स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे माझी बाजू सत्य असल्याचे सिद्ध होईल. 

जनतेने खासदार म्हणून लोकशाही पद्धतीने निवडून दिले आहे. त्यामुळे आपले जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच राहणार आहे. गेल्या ८ वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत अविरतपणे झटत आहे. खासदार म्हणून गेल्या २ वर्षांत आपण आपल्या जिल्ह्याचे, शेतकरी शेतमजूर, गोरगरीब, व्यापारी, महिला, विद्यार्थी यांच्या हिताचे अनेक प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडले. कोरोनाकाळात आपण जिल्ह्यांतील लाखो लोकांची अहोरात्र सेवा केली. अनेकांना मदतीचा हात दिला. 

हेही वाचा : लॉकडाउनच्या झळा : कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नसल्याने पंचतारांकित हॉटेल बंद

अमरावती जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन केवळ एक महिला आहे म्हणून मला त्रास देण्याचे, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे व माझे खच्चीकरण करण्याचे काम केलेले आहे. हे एक राजकीय षड्यंत्र आहे. मी संघर्ष करणारी महिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल व तेथे सत्याचाच विजय होईल, असा विश्वास आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, स्नेहीजन यांनी विचलित होऊ नये. जनसेवेचे आपले कार्य अविरत सुरूच राहील, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख