खासदार नवनीत राणा मुंबईला रवाना, श्‍वास घ्यायला होतोय त्रास  - mp navneet rana leaves for mumbai having trouble breathing | Politics Marathi News - Sarkarnama

खासदार नवनीत राणा मुंबईला रवाना, श्‍वास घ्यायला होतोय त्रास 

अतुल मेहेरे 
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार तात्काळ मुंबईला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. अँबुलेन्स द्वारे रस्तामार्गे खासदार नवनीत राणा यांचेसह आमदार रवी राणा मुबई कडे रवाना झाले. मुबंई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. 

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आज सकाळपासून श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याने आणि फुफ्फुसावर परिणाम झाल्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना करण्यात आले आहे. तेथे लीलावती रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे. आत्ता एक तासापूर्वी त्या पती रवी राणा यांच्यासोबत अँबुलेन्सने रस्तामार्गे मुंबईकडे निघाल्या. मागील आठवड्यात कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांच्यावर अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 

अस्वस्थ वाटत असल्यामुळे सोमवारी रात्री उशिरा नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. येथे डॉक्टरांनी केलेल्या उपचारांनंतर अद्यापही त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पुढील उपचार मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती युवा स्वाभिमानी पक्षाचे अमरावती जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी दिली. 

आज दिवसभरात त्यांच्या प्रकृतीमध्ये पाहिजे तशी सुधारणा झाली नाही. आमदार रवी राणा नागपूरला आई-वडिलांच्या सेवेत असताना पॉझिटिव्ह आढळले. त्यांनाही वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे, नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा, त्यांचे आई-वडील हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावरही नागपूरला ओक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मागील आठवड्यापासून उपचार सुरू आहेत. पैकी आमदार राणा आज त्यांच्यासोबत मुंबईला रवाना झाले. त्यांच्याच कुटुंबातील इतर सदस्यांवर अमरावती येथील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा कोरोना रॅपिड टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे मुले तसेच कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष देण्यात नवनीत राणा अमरावतीला व्यग्र होत्या. 

वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार तात्काळ मुंबईला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. अँबुलेन्स द्वारे रस्तामार्गे खासदार नवनीत राणा यांचेसह आमदार रवी राणा मुबई कडे रवाना झाले. मुबंई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख