खासदार धानोरकर म्हणाले, कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करू नका...  - mp dhanorkar said do not public the identity of the person who died due to corona | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

खासदार धानोरकर म्हणाले, कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करू नका... 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

जे व्यक्ती मृत्यू पावत आहेत. त्यांच्या वार्डाचे व वयाच्या उल्लेख असलेली प्रेस नोट प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात येते. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना व कुटुंबातील लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

चंद्रपूर : मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुत्यू पावलेल्या लोकांच्या देखील आकड्यात वाढ होत आहे. लोकांमध्ये देखील भीतीचे वातावरण दिसून येत आहे. त्यात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, बेव पोर्टल व समाजमाध्यमांत मुत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करण्यात येते. ती सार्वजनिक करू नये, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिली आहे.

मृताची ओळख जाहीर केल्याने त्यांच्या कुटुंबांतील व्यक्तींना व परिसरातील नागरिकांना मनस्ताप होत असतो. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करणे टाळले पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू होत आहेत. अतिशय वेगाने या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीसुद्धा तिसरी लाट देखील लवकरच येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु यामध्ये जे व्यक्ती मृत्यू पावत आहेत. त्यांच्या वार्डाचे व वयाच्या उल्लेख असलेली प्रेस नोट प्रशासनाच्या माध्यमातून काढण्यात येते. त्यामुळे त्या परिसरातील लोकांना व कुटुंबातील लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची ओळख सार्वजनिक करू नका संबंधित विभागाला तसे निर्देश द्या, अशी सूचना खासदार धानोरकर यांनी केली आहे.

कोविड केअर सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक प्रभावशाली असून मोठ्या प्रमाणात मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. त्यासोबतच आता तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था उभारण्याची गरज आहे. बल्लारपूर तालुक्यात ५१० बेड्सचे नियोजन असून त्यातील काहीच केंद्र कार्याविन्त झाले आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांत पूर्ण क्षमतेने कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी प्रशासनाला केल्या आहे.  

खासदार बाळू धानोरकर यांनी या केंद्राला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी ढवळे, तहसीलदार राईंचवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम, मुख्याधिकारी नगर परिषद सरनाईक, काँग्रेस नेते घनशाम मुलचंदानी, करीमभाई, भास्कर माकोडे, देवेंद्र आर्या, जयफराज बजगोती, डॉ. भसारकर, इस्मानभाई, मो. फारूक यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी समाजकल्याण विभागाचे मुलीचे व मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली. यामध्ये २ जनरेटर, ५ व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, रुग्णवाहिका ठेवण्याच्या त्यांनी सूचना केल्या. यावेळी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. 

समाजकल्याण विभाग मुलींचे वसतिगृह  येथे ६० बेड कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासोबतच मुलांचे वसतिगृह येथे १२० बेड्स, बल्लारपूर स्टेडियम परिसरात स्पोर्ट हॉल येथे ४० बेड्स, पॉव्हेलिअम बिल्डींग येथे ४० बेड्स, बॅडमिंटन हॉल येथे ७० बेड्स, कळमना प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच मानोरा आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी ८० अशी व्यवस्था केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु यातील काहीच सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता संपूर्ण केंद्र पूर्ण क्षमतेने १० दिवसांत कार्यान्वित करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख