mp dhanorkar said this is a conspiracy to discredit the mahavikas aghadi | Sarkarnama

खासदार धानोरकर म्हणाले, हे तर महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे षडयंत्र 

तुषार अतकरे 
सोमवार, 29 जून 2020

जनता कर्फ्यूसारखे प्रकार करुन नागरीकांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असल्याने महाविकास आघाडीत असलेल्या कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेकडून याचा जाहीर निषेध करीत असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगीतले. वणीतील जनता कर्फ्यूमुळे पुन्हा एकदा भाजप व कॉंग्रेस आमनेसामने आल्याचे दिसत आहे.

वणी (जि. यवतमाळ) ः कोरोना विषाणुने महाराष्ट्रासह संपुर्ण जगाला कवेत घेतले आहे. महाराष्ट्रात बाधितांची संख्या मोठी असली तरी महाविकास आघाडी सरकार परिस्थिती योग्य प्रकारे हाताळत आहे. त्यामुळे विरोधक जनता कर्फ्यूसारखे प्रकार करुन ठाकरे सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र करीत असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केला. भारतीय जनता पक्षाला त्यांनी अप्रत्यक्षरित्या टोलाच लगावला आहे. 

देशातच कोरोना बाधितांची संख्या झपाटयाने वाढत आहे. वणी परिसरात मे महिन्यापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र मुंबईवरुन आलेले दांपत्य कोरोना संक्रमित निघाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या बाधितांची संख्या सातवर पोचली आहे त्यामुळे शहरात कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी सोमवारपासुन पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. मात्र खासदार धानोरकर यांनी जनता कर्फ्यूर आक्षेप घेत आधिच आर्थिक संकटात असलेल्या व्यवसायिकांना व जनतेला वेठीस धरु नये असे स्पष्ट केले होते. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी व मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार भाजपाकडून सध्यस्थितीत सुरु असल्याचे ते म्हणाले. 

जनता कर्फ्यूसारखे प्रकार करुन जनतेचे कैवारी असल्याचा देखावा निर्माण केला जात असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला आहे. मागील तीन महिन्यांपासुन राज्यात कोरोना विषाणूजन्य आजारांचा प्रसार होत असताना हेच भाजपाचे नेते गोरगरीबांना अन्नधान्य वाटताना दिसले नाही. तर त्यावेळी ते भूमीगत झाले होते. टाळेबंदीमुळे अनेक उदयोग व्यवसाय डबघाईस आले आहे. अनेकांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कोणताही प्रयत्न केंद्र सरकारकडून होताना दिसत नाही. उलट जनता कर्फ्यूसारखे प्रकार करुन नागरीकांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असल्याने महाविकास आघाडीत असलेल्या कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेनेकडून याचा जाहीर निषेध करीत असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगीतले. वणीतील जनता कर्फ्यूमुळे पुन्हा एकदा भाजप व कॉंग्रेस आमनेसामने आल्याचे दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख