या सरकारपेक्षा मोगल तरी चांगले होते… : चंद्रशेखर बावनकुळे - moghals were better bthis government said chandrasekhar bavankule | Politics Marathi News - Sarkarnama

या सरकारपेक्षा मोगल तरी चांगले होते… : चंद्रशेखर बावनकुळे

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020

मंदिर उघडले, आज पहिला दिवस आहे. आज महाआरती झाली. आईच्या दर्शनासाठी भक्त उत्सुक झाले होते. तरीही भावनेच्या भरात आम्ही कुठल्याही नियमाचे उल्लंघन होऊ दिले नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

नागपूर : महाराष्ट्रात आज मोगलाई सुरू आहे. आजची स्थिती बघून असे म्हणावे वाटते की, मोगल तरी चांगले होते, इंग्रज तरी चांगले होते, दिलेल्या शब्दाला पक्के राहत होते. पण सध्या महाराष्ट्रात मुगल आणि इंग्रजांपेक्षाही वाईट सरकार आले आहे. आधी सांगितले की चार महिन्यांतील वीज बिलांमध्ये आम्ही दुरूस्ती करू, पण काहीही केले नाही. अतिशय वाईट म्हणजे ९६ लाख परिवारांची वीज कापण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता येवढ्या मोठ्या संख्येने घरं अंधारात जाण्याची भिती आहे. सरकारने लॉकडाऊनच्या काळातील बिले कमी करुन दिलेली नाहीत. सरकारने दिलेला शब्द फिरवला आहे. वीज बिलाच्या प्रश्‍नावर आम्ही पुन्हा उग्र आंदोलन करु, असे राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले. 

३०० युनिट प्रतिमहिना या प्रमाणे चार महिन्यांचे १२०० युनिटचे बिल सरकारने माफ केलेच पाहिजे. सरासरी बिले पाठवण्यात आली आहेत. एक लाईट जळत असे त्या ठिकाणीही सहा-सहा हजार रुपयांची बिले पाठविण्यात आली आहेत. ही बिले त्वरित दुरूस्त केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न केल्यास महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. 

सरकारने लोकांचा आधारच काढून घेतला होता
कोरोनाच्या या संकटात लोकांना मंदिरांचा आधार आहे. पण राज्य सरकारने राज्यातील जनतेचा आधारच काढून घेतला होता. जनता सरकारवर चिडली होती. त्यांचा आक्रोश आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून पुढे आणला. आमच्या मागणीला सरकारने दाद दिली नाही, पण त्यांनीच जेव्हा सर्व्हे केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, जनता चिडली आहे. आता जर मंदिरे उघडली नाही, तर जनता आपल्याला माफ करणार नाही. या भितीमुळेच त्यांनी मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

राज्य सरकारने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आज कोराडीच्या जगदंबा मातेचे मंदिर उघडण्यात आले आहे. सकाळी ६.३० ला पहिली आरती, ११.३० वाजता दुसरी आणि सायंकाळी ७.३० वाजता तिसरी आरती नियमाप्रमाणे होईल. कोरोनाचे संक्रमण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. एका तासात १०० भक्तांना दर्शन करता येणार आहे. आई जगदंबेचे आम्ही सर्व भक्त, ट्रस्टींमध्ये आज आनंद आहे. राज्यातील जनता आज सुखावलेली आहे. यासाठी आम्हाला राज्यभर आंदोलन करावे लागले होते, त्यानंतर कुठे आजचा दिवस बघायला मिळाला. 

मंदिर उघडले, आज पहिला दिवस आहे. आज महाआरती झाली. आईच्या दर्शनासाठी भक्त उत्सुक झाले होते. तरीही भावनेच्या भरात आम्ही कुठल्याही नियमाचे उल्लंघन होऊ दिले नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले. सॅनिटायजरचा वापर योग्य रितीने केला आहे. काही अतीउत्साही भक्तांमुळे गर्दी झाली होती, कुठे तरी नियमाचे पालन झालेले नाही. हे मान्य आहे, पण यानंतर असे होणार नाही आणि नियमांचे पालन काटेकोरपणे केले जाईल, असे श्री बावनकुळे म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख