आमदारच म्हणतात, वाळू तस्करांना नेत्यांचे अभय.. - mla says sand smugglers are safeguarded by leaders | Politics Marathi News - Sarkarnama

आमदारच म्हणतात, वाळू तस्करांना नेत्यांचे अभय..

अभिजित घोरमारे
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

राजकीय नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सहभाग यामध्ये असावा, अशा संशय जर आमदार भोंडेकर यांना आहे. तर त्यांनी चौकशी करुन त्यांची नावे उघड करावी. ते स्वतः लोकप्रतिनिधी असताना त्यांनी लोकप्रतिनिधींवर आरोप करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भंडारा : दोन दिवसांपूर्वी वाळूच्या टिप्परने दिलेल्या धडकेत गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आमदारांना जाग आली आणि प्रशासनाला सूचना देत त्यांनी वाळू घाटांवर कारवाई सुरू केली. दरम्यान पत्रकारांशी बोलताना आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, वाळू तस्करांना जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील नेत्यांचे अभय आहे. त्यामुळेच त्यांची मुजोरी वाढली आहे. वाळू तस्करीत मोठे अधिकारी गुंतले असल्याचीही शक्यता त्यांनी वर्तविली.

घाटांवरून टिप्परद्वारे वाळुची बेफाम वाहतूक होत असते. जागरुक नागरिकांनी वारंवार याच्या तक्रारी प्रशासनाकडे आणि आमदारांकडे केल्या. पण त्याची दखल घेतली गेली नाही. टिप्परच्या धडकेने एक गर्भवती ठार झाल्यानंतर लोक भडकले, आंदोलन झाले. त्यानंतर कुठे आमदारांना जाग आली आणि त्यांनी या प्रकाराची दखल घेतली. यापूर्वीच नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली गेली असती, तर ती मृत मनिषा किरणापुरे आणि तिच्या पोटातील बाळ दोघेही जीवंत असते, असे नागरिक बोलत आहेत. वरिष्ठ अधिकारी वाळू तस्करीमध्ये गुंतले असल्याची शंका आमदारांना असेल तर त्यांनी चौकशी करुन दोषींना शासन करावे, अशीही मागणी जोर धरत आहे. 

मांडवी, वडेगाव रिढी वाळू घाटांवर आमदार भोंडेकर यांनी महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांसह भेट देऊन जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गावाकडील रस्त्यांवर तयार झालेले वाळुचे डोंगर बघून आमदार आणि अधिकाऱ्यांनी तोंडात बोटे घातली. भंडारा जिल्ह्यातील वाळूला विदर्भभर मागणी आहे. त्यामुळे तस्करी जोरात सुरू आहे. वाळुची वाहतूक करणारे ट्रक आणि टिप्पर बेफाम वाहने चालवितात आणि अशाच टिप्परखाली येऊन गर्भवती महिला मृत्युमुखी पडली. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना या प्रकाराची दखल घेण्यासाठी एका महिलेचा जीव जाण्याची वाट का बघावी लागली, असाही प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

राजकीय नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा सहभाग यामध्ये असावा, अशा संशय जर आमदार भोंडेकर यांना आहे. तर त्यांनी चौकशी करुन त्यांची नावे उघड करावी. ते स्वतः लोकप्रतिनिधी असताना त्यांनी लोकप्रतिनिधींवर आरोप करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवा वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे वाळूच्या चोरीमुळे जर कुणाचा जीव गेला तर जिल्ह्यात याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पुढारी आणि अधिकाऱ्यांनी आत्ताच सतर्क होण्याची गरज आहे.                (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख