आमदार रवी राणांनी ‘हा’ मुद्दा मांडला मुख्य सचिवांच्या दरबारी, दिला आंदोलनाचा इशारा... - mla ravi rana raised this issue in front of the chief secretary hint of agitation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

आमदार रवी राणांनी ‘हा’ मुद्दा मांडला मुख्य सचिवांच्या दरबारी, दिला आंदोलनाचा इशारा...

अरुण जोशी
मंगळवार, 4 मे 2021

गांभीर्याने विचार करून तात्काळ उपाययोजना न केल्यास व अमरावती जिल्ह्याला न्याय न मिळाल्यास येत्या काही दिवसांत आपण मुख्य सचिवांच्या दालनातच तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी यावेळी दिला.

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील कोरोनाच्या भयावह परिस्थितीबाबत आमदार रवी राणा यांनी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आमदार राणा यांनी अमरावती जिल्ह्यात रेमडीसीवर इंजेक्शन, ऑक्सिजनची कमतरता, बेडची अपुरी संख्या, व्हेंटिलेटरचा तुटवडा व डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक यांची अपुरी संख्या हे सर्व मुद्दे मांडले. या सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची आमदार राणा यांनी मुख्य सचिवांकडे मागणी केली

यावेळी आमदार राणा म्हणाले, केंद्राकडून लसी मिळूनसुद्धा अमरावती जिल्ह्यात गेल्या 5-6 दिवसांपासून लसीकरण बंद आहे. भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहूनसुद्धा नागरिकांना लस उपलब्ध होत नसल्यामुळे निराश होवून रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. सरकारी व खाजगी दवाखान्यांतसुद्धा लसीकरणाचे तीनतेरा, वाजले आहेत. अमरावती जिल्ह्यावर अन्याय होत असल्याचे आमदार रवी राणा यांनी मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. महाराष्ट्र सरकारमध्ये महत्वाचे खाते सांभाळणाऱ्या व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या मंत्र्यांना याबाबतचे गांभीर्य नसून त्यांचा प्रभाव शून्य असल्याने अमरावती जिल्यासाठी आवश्यक असणारा रेमेडसीवर साठा वळता करण्यास अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोपही आमदार रवी राणा यांनी यावेळी नाव न घेता केला. 

या सर्व बाबींवर गांभीर्याने विचार करून तात्काळ उपाययोजना न केल्यास व अमरावती जिल्ह्याला न्याय न मिळाल्यास येत्या काही दिवसांत आपण मुख्य सचिवांच्या दालनातच तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार रवी राणा यांनी यावेळी दिला. मुख्य सचिव  सीताराम कुंटे यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत आमदार रवी राणा यांचे समवेत अपर मुख्य सचिव(गृह) मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव लिमये,आरोग्य संचालक, अपर मुख्य सचिव (आरोग्य) श्री प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.

हेही वाचा : निवडणुका संपल्या अन् मोदी सरकारचा इंधन दरवाढीचा दणका

आमदार रवी राणा यांनी मंत्री बच्चू कडू यांचे नाव न घेता आरोप केले आहेत आणि आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे आता अमरावती जिल्ह्यासाठी कमतरता भासणाऱ्या बाबींची पूर्तता होते की एका नवीन वादाला तोंड फुटते, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख