नव्या दमाचा चेहरा होईल नागपूर पदवीधर मतदारसंघाचा आमदार ! - mla of nagpur graduate constituency will be the face of new youth | Politics Marathi News - Sarkarnama

नव्या दमाचा चेहरा होईल नागपूर पदवीधर मतदारसंघाचा आमदार !

अतुल मेहेरे
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

काँग्रेस पक्षाकडून अभिजित वंजारी यांचे नाव यापूर्वीच निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अभिजित वंजारी यांनी पूर्वीपासून तयारी सुरू केली असली तरी काँग्रेसमध्ये ज्याचे नाव चालते त्याला ऐनवेळी डावलण्याचा इतिहास आहे. या मतदारसंघात ऐनवेळी कॉंग्रेसकडून गिरीश पांडव अथवा आशिष देशमुख यांचा विचार होऊ शकतो.

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघातून यापूर्वी आमदार असलेले प्रा. अनिल सोले यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या जागेसाठी येत्या काही दिवसांत निवडणूक जाहीर होऊ शकते. त्या जागेवर भाजपकडून पुन्हा एकदा प्रा. अनिल सोले यांना उमेदवारी मिळेल की नव्या चेहऱ्याला संधी मिळेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. असे असले तरी भाजपकडून यंदा नव्या आणि युवा चेहऱ्याला संधी देण्यात येणार असून नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून अभिजित वंजारी, गिरीश पांडव अथवा आशिष देशमुख यांच्या नावाची चर्चा असल्याचे सूत्र सांगतात. त्यामुळे काहीही होवो विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाचा आमदार हा युवा चेहरा असेल, येवढे मात्र निश्‍चित. 

विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात सध्या प्रा. अनिल सोले आमदार होते. १८ जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ संपला. आमदार होण्यापूर्वी ते नागपूरचे महापौर होते. भाजपमधून या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. प्रा. अनिल सोले यांच्याऐवजी नव्या व्यक्तीला संधी मिळावी, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. भाजपचे पक्षश्रेष्ठीही याच मताचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नवा चेहरा कोण, यावर चर्चा सुरू झाली असून नागपूरचे महापौर संदीप जोशी यांचे नाव आघाडीवर आहे. महापौर संदीप जोशी हे युवा आणि संवेदनशील नेतृत्व आहे. त्यांचा कामाचा धडाका मोठा आहे आणि सामाजिक कार्याचा व्यापाही मोठा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास विश्वासातील म्हणून त्यांची ओळख आहे. नागपूर महानगरपालिकेत स्थायी समितीचे सभापती असताना त्यांनी ना. गडकरी यांच्या स्वप्नातील अनेक प्रकल्पासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून सत्यात उतरविण्याच्या दिशेने पावले टाकली. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्षे स्थायी समिती सभापती होण्याचा मान संदीप जोशी यांना मिळाला होता. 

काँग्रेसची मोर्चेबांधणी
दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून अभिजित वंजारी यांचे नाव यापूर्वीच निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते. अभिजित वंजारी यांनी पूर्वीपासून तयारी सुरू केली असली तरी काँग्रेसमध्ये ज्याचे नाव चालते त्याला ऐनवेळी डावलण्याचा इतिहास आहे. या मतदारसंघात ऐनवेळी कॉंग्रेसकडून गिरीश पांडव अथवा आशिष देशमुख यांचा विचार होऊ शकतो. जर भाजपकडून महापौर संदीप जोशी यांची उमेदवारी निश्चित झाली तर काँग्रेस असो अथवा भाजपा, विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाचा आमदार हा नव्या दमाचा युवा आमदार असेल, एवढे मात्र निश्चित...!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख