आमदार जोरगेवारांचे चार एक्के दे धक्के, तर भाजपचे २०० युनिट मोफतचे आंदोलन...

जिथे जाऊ तिथे खाऊ, या भाजपच्या धोरणामुळे चंद्रपूर महानगरपालिका भष्टाचाराचे माहेरघर बनले आहे. चंद्रपूरकरांच्या पैशाची उधळपट्टी करीत स्वतःची हौस पूर्ण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे.
आमदार जोरगेवारांचे चार एक्के दे धक्के, तर भाजपचे २०० युनिट मोफतचे आंदोलन...
Kishor Jorgewar - Rakhi Kancharlawar

चंद्रपूर : महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. महापौरांनी नवीन वाहन घेतले आणि त्यासाठी ज्यादाचे पैसै खर्च करून अतिविशीष्ट क्रमांक चार एक्के (११११) घेतला. हा मुद्दा चांगलाच गाजला. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी गेल्या आठवड्यात ‘चार एक्के दे धक्के’ आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही जोरगेवारांच्या २०० युनिट मोफत विजेचा मुद्दा उचलून धरत आंदोलन केले.  BJP's two hundres units free agitation. 

यंग चांदा बिग्रेडचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पुकारलेल्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी दोनशे युनिट मोफत विजेचा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरले. गांधी चौकात आयोजित दोन्ही आंदोलनाच्या वेळा ठरल्या होत्या. मात्र, पोलिसांनी भाजप आणि यंग चांदा बिग्रेडने आंदोलनस्थळी उभारलेले मंच काढायला लावले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या दिला. पोलिसांनी बळाचा वापर करून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करावे लागले. तत्पूर्वी, पोलिस आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच झोंबाझोंबी झाली. त्यानंतर आमदार जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा बिग्रेडचा मोर्चा निघाला. त्यामुळे गांधी चौकात तणाव निर्माण झाला होता.

मनपातील कथित भ्रष्टाचाराविरोधात आमदार किशोर जोरगेवार यांनी चार एक्के दे धक्के आंदोलन केले. तत्पूर्वी, या आंदोलनाच्या वातावरण निर्मितीसाठी गावात मोठ-मोठे फलक लावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरगेवार यांच्या दोनशे युनिट मोफत आश्वासनाचा आधार घेत भाजपनेही त्यांना लक्ष्य करणारे फलक लावले. यंग चांदा ब्रिगेड आणि भाजपचे आंदोलन एकाच दिवशी, एकाच स्थळी गांधी चौकात ठरले. मात्र त्यांच्या वेळा वेगवेगळ्या होत्या. दरम्यान, आंदोलस्थळी दोन्ही पक्षांनी मंच उभारले होते. सकाळी अकरा वाजता भाजपचे पदाधिकारी आंदोलनस्थळी पोहचले. तेव्हा उपविभागीय अधिकारी शीलवंत नांदेडकर यांनी दोन्ही मंच काढण्याचे आदेश दिले. परंतु, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुरवातीला त्याला नकार दिला. शेवटी पोलिसांनीच पुढाकार घेऊन ते मंच काढले. त्यानंतर महापौर राखी कंचर्लावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपमहापौर राहुल पावडे, शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी भाजप कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरगेवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. 

दोन तासांपेक्षा जास्तवेळ त्यांनी ठिय्या दिला. दरम्यान, जोरगेवार यांच्या आंदोलनाची निर्धारित वेळ निघून गेली. त्यांचे कार्यकर्ते तिथे यायला सुरुवात झाली. तणाव निर्माण झाला. दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकार करायला सुरूवात केली. पोलिसांशी झोंबाझोंबी सुरू केली. शेवटी पोलिसांनी महापौर, देवराव भोंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांना अक्षरशः उचलून पोलिस वाहनात टाकले. सर्वांना पोलिस मुख्यालयात स्थानबद्ध करण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जोरगेवार यांचा मोर्चा निघाला. त्यांनी महानगरपालिकेवर धडक दिली आणि सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केले. या दोन्ही आंदोलनाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर चंद्रपुरातील गांधी चौकात राजकीय संघर्ष बघायला मिळाला. 

भष्ट्राचाऱ्यांना धक्का देण्यासाठी संघटीत व्हा : आमदार जोरगेवार
जिथे जाऊ तिथे खाऊ, या भाजपच्या धोरणामुळे चंद्रपूर महानगरपालिका भष्टाचाराचे माहेरघर बनले आहे. चंद्रपूरकरांच्या पैशाची उधळपट्टी करीत स्वतःची हौस पूर्ण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे. पालिकेतीत चार भ्रष्टाचारी एक्यांना खुर्चीवरुन धक्का देण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. पालिकेतील सत्ताधारी जनतेच्या पैशाची लूट करत आहे. कोरोना काळात व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी निधी नसल्याचे सांगणाऱ्या महापौरांनी मनपाच्या पैशातून 11 लाखांची गाडी खरेदी केली. इतकेच नव्हे, तर 70 हजार रुपये अतिरिक्त खर्च करत 1111 हा व्हीआयपी नंबर मिळविला. मनपाच्या 200 कोटींच्या कामात अनियमितता असल्याचे लेखा परिक्षणात आढळून आले. 

कोरोना काळात याच सत्ताधाऱ्यांनी डब्बा घोटाळा करत गरजू जनतेचे थट्टा करण्याचे काम केले. दोन वर्षात पूर्ण होणार असलेली अमृत योजना पाच वर्षात या पालिकेला पूर्ण करता आली नाही. आझाद बाग घोटाळा, कचरा संकलन घोटाळा, कोविड घोटाळा, प्रसिद्धी निविदा घोटाळा, मालमत्ता कर मूल्यांकन घोटाळा, दलितवस्ती सुधार निधी घोटाळा, शहरातील रस्ते घोटाळा, मास्क खरेदी घोटाळा असे अनेक घोटाळे करीत ही महानगरपालिका राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट पालिका ठरली आहे. महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी हे पालिकेतील भ्रष्ट तीन एक्के आणि बाहेरचा म्हणजेच रेमडिसिव्हर घोटाळेबाज डॉ. मंगेश गुलवाडे या चार एक्क्यांनी एक मत करीत महापालिकेला भ्रष्टाचाराचे माहेरघर बनविले आहे, असा आरोप जोरगेवारांनी केला. 

...तर मोफत विजेचा ठराव : महापौर कंचर्लावार
सन 2019 च्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्‍या घोषणापत्रात चंद्रपुरातील जनतेला दर महिन्‍याला विजेचे 200 युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. पावणेदोन वर्षानंतरसुद्धा सरकारला समर्थन देणाऱ्या या आमदारानी आपले आश्‍वासन पूर्ण करण्‍यासाठी कुठलेही पाऊल उचलले नाही व जनतेची फसवणूक केली आहे. दोनशे युनिट मोफत चंद्रपूरकरांना मिळाले पाहिजे. जनतेची तशी मागणी असेल, तर मनपात तसा ठराव घेवू, असे महापौर राखी कंचर्लावार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमदार किशोर जोरगेवार सरकारचे समर्थक म्हणून ओळखले जातात. अशावेळेला इतक्‍या प्रचंड बहुमतात असलेल्‍या सरकारकडून 200 युनिट मोफत देण्‍याचे आश्‍वासन पूर्ण न करता जनतेशी विश्‍वासघात करीत आहेत. अशा आमदारांना आपल्‍या पदावर क्षणभरही राहण्‍याचा अधिकार नाही. त्‍यांनी ताबडतोब आमदारकीचा राजीनामा द्यावा. महानगरपालिकेने केलेल्या विकासकामांमुळे विरोधकांना आपण सत्तेत येणार नाही. याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांच्याकडून बेछूट आरोप केले जात आहे. जो काम करतो. त्यांच्यावरच आरोप केले जातात. त्यामुळे माझ्यावर व्यक्तिगत आरोप केले जात आहे, असेही महापौरांनी स्पष्ट केले. यावेळी स्थायी समिती सभापती रवी आसवानी, उपमहापोर राहुल पावडे, सभागृह नेते संदीप आवारी आदींची उपस्थिती होती. 
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in