आमदार देवेंद्र भुयार म्हणतात, मी महाविकास आघाडी सोडणार नाही...  - mla devendra bhuyar said i will not leave mahavikas alliance | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार देवेंद्र भुयार म्हणतात, मी महाविकास आघाडी सोडणार नाही... 

अरुण जोशी 
मंगळवार, 6 एप्रिल 2021

या पोटनिवडणुकीत आधीच महाविकास आघाडी व राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असली तरी महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सचिन राऊत यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे.

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवार दिल्याने राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा जोरदार होत आहेत. तर प्रत्येक वेळी राग आला म्हणून सरकारबाहेर पडणे योग्य नसल्याचे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. मी महाविकस आघाडीमध्येच राहणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे राजू शेट्टी यांनी जरी महाविकास आघाडीला रामराम ठोकला, तरी मोर्शी-वरुड मतदार संघातील राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीचे आमदार मात्र महविकास आघाडी सोबतच राहणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहू लागले आहे. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाल्याने येथे पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी १७ एप्रिलला निवडणूक पार पडणार आहे, तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीने दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले आहे. तर भाजपानेही भगीरथ भालके यांना टक्कर देण्यासाठी समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. 

या पोटनिवडणुकीत आधीच महाविकास आघाडी व राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली असली तरी महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सचिन राऊत यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे.‘महाविकास आघाडीमध्येच राहून कामे करणार.’ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या या उमेदवारीवरून माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा होते आहेत. दरम्यान, प्रत्येकवेळी राग आला, चीड आली म्हणून सरकार बाहेर पडणे योग्य नाही, असा सबुरीचा सल्ला आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना दिला आहे. राजू शेट्टी जर कदाचित महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले, तरी मी मात्र महाविकास आघाडीमध्येच राहून विकास कामे करणार असल्याचे ते म्हणाले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख