महापौरांना मिळाला गडकरी आणि फडणवीसांचा आशिर्वाद ! - mayor gets blessings of gadkari and fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

महापौरांना मिळाला गडकरी आणि फडणवीसांचा आशिर्वाद !

राजेश चरपे
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

संदीप जोशी २००२ पासून सतत नगरसेवक आहेत. चार वेळा त्यांनी महापालिकेची निवडणूक जिंकली आहे. स्थायी समितीचे सलग दोन वर्षे ते सभापती होते. महापालिकेच्या कार्यकाळात ही किमया कोणालाच जमली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे पालकत्व त्यांच्याकडे सोपविले होते.

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विद्यमान आमदार अनिल सोले की महापौर संदीप जोशी, याची उत्सुकता शिगेला गेली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा दोन दिवस नागपुरात तळ ठोकून होते. अखेर या निवडणुकीसाठी युवा नेते महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने सर्वांनाच धक्का दिला. सोबतच पुढील राजकीय वाटचालीचे ‘व्हीजन'ही स्पष्ट केल्याचे बोलले जात आहे. 

जोशी यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोश निर्माण झाला असून त्यांना काँग्रेसचे युवा नेते ॲड. अभिजित वंजारी यांचा सामना करावा लागणार आहे. जोशी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. सोले यांचे गडकरी यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. मात्र जोशी यांना दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद लाभल्याचे बोलले जाते. 

सोले आणि जोशी यांच्यातच भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू होती. दोन दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलसुद्धा दोन दिवस नागपुरात मुक्काम ठोकून होते. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला गेली होती. काँग्रेसने अभिजित वंजारी यांच्या नावाच्या घोषणेनंतरही भाजपचा उमेदवार जाहीर केला जात नसल्याने सोले यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली होती. आज भाजपने युवा नेत्याला उमेदवारी देऊन पुढील वाटचालीचे संकेत दिले आहे. 

सांस्कृतिक महोत्सव ते दीनदयाळ थाळी 
संदीप जोशी २००२ पासून सतत नगरसेवक आहेत. चार वेळा त्यांनी महापालिकेची निवडणूक जिंकली आहे. स्थायी समितीचे सलग दोन वर्षे ते सभापती होते. महापालिकेच्या कार्यकाळात ही किमया कोणालाच जमली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचे पालकत्व त्यांच्याकडे सोपविले होते. त्यांना महापौर करून फडणवीस यांनी त्यांचा पुढील मार्ग आणखी प्रशस्त केला होता. स्थायी समितीचे सभापती असताना जोशी यांनी नागपूरकरांची सांस्कृतिक गरज भागवण्यासाठी सुरू केलेला नागपूर महोत्सव चांगलाच गाजला. पुढे गडकरी यांनी खासदार महोत्सवात त्याचा समावेश केला. 

युवा झेप प्रतिष्ठान, प्रहार जागृती संस्था, नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना, व्हीजन नेक्स्ट फाऊंडेशन, प्रो. राजेंद्रसिंग सायंस एक्स्पोरेटरी सेंटर, नागपूर कुस्तीगीर अकॅडमी अशा अर्धा डझन संघटनांचे जोशी अध्यक्ष आहेत. या माध्यमातून ते क्रीडा, युवक, विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिकांशी संपर्कात असतात. मेडिकल आणि रामदासपेठेतील रुग्णालयांमध्ये विविध राज्यातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी त्यांनी सुरू केलेल्या दीनदयाळ थाळी या उपक्रमातून आपली सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे.    

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख