कुणी कितीही स्ट्रॅटीजी तयार केली, तरी लोकांच्या मनांवर मोदीच राज्य करतात...

सरकारने जर सकारात्मकपणे विचार केला असता तर परवानगी देणे सहज शक्य होते. कारण वारकऱ्यांचेही म्हणणे असे होते की, केवळ ५० लोकांची पायी वारी नेण्याची परवानगी आम्हाला द्यावी.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvis

नागपूर : सध्या राज्यासह देशभरात प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीची चर्चा आहे. या भेटीवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज्यातील नेते आपआपल्या परीने या भेटीचे अर्थ काढत आहेत. या भेटीबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज विचारणा केली असता, कुणी, कुणाला आणि केव्हा भेटावं, याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कुणी कितीही स्ट्रॅटीजी तयार केली, तरी लोकांच्या मनांवर मोदीच राज्य करतात, असे ते म्हणाले. 

या भेटीबाबत अधिक बोलताना फडणवीस म्हणाले की, कोणी कोणाला भेटावं यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटीजी तयार केली आणि कितीही जोर लावला, तरी २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होईल, यात तिळमात्रही शंका नाही. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक सक्षम नेतृत्व देशाला मिळालेलं आहे. त्यांच्या नावाचा देशातच नव्हे तर जगभरात डंका आहे. त्यामुळे इतर सर्व पक्षांचे लोक काहीच्या बाही वावड्या उठवत असतात. पण यामुळे केंद्रातील आमच्या सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही. कुणी कशीही व्युव्हरचना आखू दे, विजय हा शिस्तबद्ध असलेल्या भाजपचाच होणार आहे. 

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या तोंडात सकाळी उठल्याबरोबर एक वाक्य येते, ते म्हणजे अमुक अमुक बाबीसाठी केंद्र सरकार जबाबदार आहे. या सरकारच्या नेत्यांमध्ये केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. त्याशिवाय दुसरे कामच यांना राहिलेले नाही. उठसूठ केंद्र सरकारला दोष देऊन हे लोक आपल्या चुका झाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा हास्यास्पद गोष्टी करणाऱ्यांच्या प्रश्‍नांना काय उत्तर द्यायचे, असा प्रतिप्रश्‍न फडणवीस यांनी केला. 

नक्षलवाद्यांना मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या पत्रकाबाबत विचारले असता ते म्हणाले, अशा पत्रकाची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे. कारण नक्षल विचार हा मुळातच विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करणार आहे, लोकांच्या मनांमध्ये सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण करणार आहे. ही त्यांची कामाची पद्धत आहे आणि म्हणून त्या पत्राची सत्यता तपासली पाहिजे. जे सत्य असेल तर, गांभीर्याने त्यासंबंधीचा विचार केला पाहिजे. 

मराठा आरक्षणासाठी भाजप नेहमीच आग्रही राहिली आहे. भाजपचे नेते मराठा मोर्चाच्या आंदोलनामध्ये आधीपासूनच सहभागी झालेले आहेत. आमचं जेव्हा सरकार होते, त्यावेळी जे मोर्चे निघाले, त्या - त्या ठिकाणचे आमचे आमदार त्या मोर्चांमध्ये सहभागी झाले होते. जेथे एका समाजाची भावना असते, तेथे पक्ष हा विषय नसतो. त्यामुळे आताही मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या काही हालचाली होतील, मोर्चे होतील, तेथे आमच्या पक्षाचे नेते त्यामध्ये सम्मीलित होतील, असे फडणवीस म्हणाले. 

वारकऱ्यांच्या वारीसंदर्भात विचारले असता फडणवीस म्हणाले की, कमी उपस्थितीमध्ये वारी करणे शक्य होते. सरकारने जर सकारात्मकपणे विचार केला असता तर परवानगी देणे सहज शक्य होते. कारण वारकऱ्यांचेही म्हणणे असे होते की, केवळ ५० लोकांची पायी वारी नेण्याची परवानगी आम्हाला द्यावी. याबाबत त्यांनी मार्गात येणाऱ्या सर्व गावांचे ठरावदेखील घेतलेले आहेत. गावातून कुणीही रस्त्यावर येणार नाही, हे त्यांनी आधीच ठरवलेले आहे. इतक्या शिस्तीत जर ते काम होणार होतं, तर सरकारने त्याचा सकारात्मकपणे विचार करायला हवा होता. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com