महाविकास आघाडी सरकार पडणार, पण आत्ताच त्यांना सावध कशाला करू ? - mahavikas alliance government will fall but why worn them now | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडी सरकार पडणार, पण आत्ताच त्यांना सावध कशाला करू ?

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज जोडण्या कापण्याच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आणि अधिवेशन संपता संपता शेवटच्या क्षणी सरकारचा खरा चेहरा समोर आला. काल सरकारने घोषणा केली की, आम्ही ही स्थगिती हटवतो आहे. यापेक्षा मोठे आश्‍चर्य जगात असू शकत नाही.

नागपूर : संधी नसतानाही जबरदस्ती बेईमानी करून हे सरकार महाराष्ट्रात राज्य करीत आहे. सरकारने जनसेवा करण्याऐवजी, जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी सुडाचे राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू केलं आहे. जनहितविरोधी निर्णय घेणारे सरकार दीर्घकाळ टिकू शकत नाही. निश्‍चितपणे हे सरकार जाणारच, असा पुनरुच्चार आज राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपून नागपुरात आल्यानंतर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकार कसे पडेल हे आत्ता जर सांगितले तर ते सावध होतील. त्यामुळे त्यांना सावध कशाला करू? जनहितविरोधी सरकार यापुढे कायम ठेवायचं नाही, हे आमचे ठरलं आहे. आजच्या संकटाच्या काळातसुद्धा जनतेला मदत करण्याऐवजी हे सरकार केवळ आणि केवळ सुडाचं राजकारण करत आहे. या सरकारमधलेच काही लोक बाहेर पडतील आणि सरकार पडेल, असे मुनगंटीवारांनी ठामपणे सांगितले. 

आज मुद्दे काढायचे म्हटलं तर खूप आहे. वीज बिलाचा मुद्दा आहे. जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतील, त्यांना ५० हजार रुपये देण्याचे वचन विधानसभेच्या पवित्र विधान मंदिरामध्ये दिले गेले होते. शिक्षण शुल्काच्या संदर्भात पालकांच्या मनात आज चिंता आहे. शिक्षण शुल्कात कुठलीही सूट दिलेली नाही. कोविडच्या काळात हातावर पोट घेऊन जगणारे परिवार काय करतील, याचे काहीच नियोजन नाही. कोरोना वाढतोय म्हणून अधिवेशनाचा कालावधी कमी केला जातो. सरकारी इमारतीमध्ये ज्यांनी भाड्याने दुकाने घेतली आहे, ती कोविड काळात सहा महिने बंद होती. त्यांच्या भाड्याच्या संदर्भात काय करणार, याचाही निर्णय सरकारने घेतलेला नाही. अशा प्रश्‍नांची यादी केली तर १०० तरी प्रश्‍न आहेत, की ज्याची उत्तर सरकारने दिली नाहीत. कोणताही प्रश्‍न विचारला तर मोहन डेलकरच्या आत्महत्येसंदर्भात प्रतिप्रश्‍न सरकारकडून केला जातो. हे घोषवाक्य सरकारमधील मंत्र्यांनी पाठच करून ठेवलेले असल्याचा घणाघात मुनगंटीवार यांनी केला. 

हेही वाचा : नागपूर शहरात १५ ते २१ मार्च लॉकडाऊन, अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू…

डेलकरांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी सरकारचे हात कुणी बांधून ठेवलेले नाहीत. त्यांनी खुशाल चौकशी करावी. विशेष कायदा निर्माण करून, विशेष कोर्ट तयार करावे आणि कारवाई करावी. केवळ बोंबा ठोकून काहीही होणार नाहीये. शेतांमध्ये काम करणारा शेतकरी, शेतमजूर अडचणीत आहे. त्याच्यासाठी काहीतरी करा ना, असा सल्ला मुनगंटीवार यांनी सरकारला दिला. 

जगातलं मोठे आश्‍चर्य
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज जोडण्या कापण्याच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली आणि अधिवेशन संपता संपता शेवटच्या क्षणी सरकारचा खरा चेहरा समोर आला. काल सरकारने घोषणा केली की, आम्ही ही स्थगिती हटवतो आहे. यापेक्षा मोठे आश्‍चर्य जगात असू शकत नाही. असे धडधडीत खोटे बोलणारे सरकार टिकू शकत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. 

संघाचा आणि सरकारचा काही संबंध नाही
आज सकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संघ मुख्यालयात डॉ. मोहन भागवत यांना भेटायला गेले. त्यातच महाविकास आघाडी सरकार पडणार, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. या दोन गोष्टींचा काही संबंध आहे का, असे विचारले असता, संघ आणि भाजप एकमेकांना विचारून राजकारण करीत नाही. सरकारचा आणि संघाचा तसा काही संबंध नाही. फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दुसऱ्या कामासाठी संघ मुख्यालयात गेले असल्याचे त्यांनी सांगितले. 
 Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख