महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार देशपांडेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा - mahavikas aghadi candidate mla deshpande violated code of conduct | Politics Marathi News - Sarkarnama

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार देशपांडेंवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

आचारसंहिता भरारी पथकाचे रणजित भोसले यांनी राजापेठ पोलिसात याप्रकरणी लेखी तक्रार देऊन नियमानुसार श्रीकांत देशपांडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

अमरावती : प्रशासनाकडून कुठलीही परवानगी नसताना महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन केले होते. याप्रकरणी श्रीकांत देशपांडे यांच्यावर राजापेठ पोलिस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांच्या आंदेालनाची दखल घेऊन आज आचारसंहिता भरारी पथक प्रमुख रणजित भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

प्रशासनाकडून अन्य उमेदवारांना प्रचार सभेसाठी परवानगी नाकारली जात असतानाच देशपांडे यांना मात्र सुट दिली जात असल्याचा आरोप संगीता शिंदे यांनी केला होता. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत श्रीकांत देशपांडे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भुमिका संगीता शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात घेतल्याने दुपारी विभागीय आयुक्तालयात एकच खळबळ उडाली होती. सत्ताधाऱ्यांविरोधात संगीता शिंदे यांनी आवाज उठविल्याने प्रशासनाची देखील अडचण झाली होती. जिल्ह्यात जमावबंदी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना तसेच निवडणूक आयोगाकडून कुठल्याही प्रचार सभेसाठी परवानगी नसताना अशा पद्धतीने खुलेआम आचारसंहिता तसेच नियमांचा भंग करणाऱ्या उमेदवारांवर कारवाई केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी आग्रही भुमिका संगीता शिंदे यांनी घेतली होती. 

विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करून सदर प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आचारसंहिता भरारी पथकाचे रणजित भोसले यांनी राजापेठ पोलिसात याप्रकरणी लेखी तक्रार देऊन नियमानुसार श्रीकांत देशपांडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी श्रीकांत देशपांडे यांच्यावर भांदविच्या कलम १८८, २६९, २७०, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम ५१(ब), साथीचे रोग अधिनियम २,३,४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख