पंतप्रधान मोदींना हरविण्याची ताकद महाविकास आघाडीत : बाळू धानोरकर - mahavakas alliance can defeat pm mode said balu dhanorkar | Politics Marathi News - Sarkarnama

पंतप्रधान मोदींना हरविण्याची ताकद महाविकास आघाडीत : बाळू धानोरकर

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 5 डिसेंबर 2020

आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, भाजपच्या ५८ वर्ष राखलेला गडाला भगदाड पाडून अभिजित वंजारी यांनी इतिहास रचला. पदवीधर मतदार संघाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. ते जमिनीवरचे व्यक्ती असून योग्य उमेदवाराला पदवीधर मतदारांनी निवडून दिले आहे.

चंद्रपूर : देशातील सार्वत्रिक निवडणुका या इव्हीएमद्वारे घेतल्या जातात. मात्र, या मशीनवर सर्वसामान्य मतदारांपासून अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पदवीधर मतदार संघात बॅलेट पेपरवर निवडणूक झाली. त्यात भाजपचा सुपडा साफ झाला. जनतेच्या मनात कोण, हे बॅलेटमधून स्पष्ट झाले. त्यामुळे येत्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरने घेतल्या गेल्यास भाजपचा पराभव निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा वाराणसीतून हरविण्याची ताकद महाविकास आघाडीत असल्याचे परखड मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.

नागपूर पदवीधर मतदार संघातून भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करीत काँग्रेसचे अ‍ॅड. अभिजित वंजारी विजयी झाले. या ऐतिहासिक विजयामुळे महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या विजयाचा आनंदोत्सव वरोरा येथे साजरा करण्यात आला. यावेळी खासदार बाळू धानोरकर बोलत होते. आमदार प्रतिभा धानोरकर, मिलिंद भोयर, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विलास टिपले, शहराध्यक्ष डॉ. खापने, विलास नेरकर, मनोहर स्वामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू चिकटे, उपसभापती देवानंद मोरे, शुभम चिमुरकर, सन्नी गुप्ता, शशी चौधरी, राहुल देवाळे यांची उपस्थिती होती. 

खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, त्यासोबतच या निवडणुकीच्या निकालांनी आणखी एक गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे बॅलेट पेपर मतदान. महाविकास आघाडी सरकारने यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या सर्वच निवडणूक ईव्हीएमद्वारे न घेता बॅलेट पेपर मतदार पद्धतीचा अवलंब करून घ्याव्या. आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, भाजपच्या ५८ वर्ष राखलेला गडाला भगदाड पाडून अभिजित वंजारी यांनी इतिहास रचला. पदवीधर मतदार संघाच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. ते जमिनीवरचे व्यक्ती असून योग्य उमेदवाराला पदवीधर मतदारांनी निवडून दिले आहे. पुढे देखील महाविकास आघाडीचा असाच विजय होत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख