महाराष्ट्राचा लसीकरणाचा नवा विक्रम, चार कोटींचा टप्पा केला पार…

आय.सी.एम.आर.ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल. केंद्राने लसीकरणाचा वेग वाढवावा. महिन्या दोन महिन्यांतच राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे.
Rajesh Tope
Rajesh Tope

नागपूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने पुन्हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्याने लस मात्रांचा चार कोटींचा टप्पा पार केला असून आतापर्यंत ४ कोटी २४ हजार ७०१ लसींचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ३ कोटी ६ लाख ९९ हजार ३३९ तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ९३ लाख २५ हजार ३६२ इतकी आहे. The number of citizens who have taken the second dose is 93 lakh 25 thousand 362.

महाराष्ट्रात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नियोजनातून व्यापक लसीकरण मोहीम राबवली जात आहे. उपलब्ध लशींचे नियोजन योग्य रितीने व्हावे, यासाठी आरोग्यमंत्री प्रयत्नशील आहेत. तसेच लस वाया जाण्याचे प्रमाणही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अत्यंत कमी आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी आजही निर्बंध कायम आहेत. यातही दिलासादायक म्हणजे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल करण्याची गरज असल्याचे राजेश टोपे म्हणाले. 

मुंबईतील लोकल कधी सुरू होणार आणि राज्यात अनलॉक कधी होणार, याबाबत प्रत्येकाच्या मनात प्रश्‍न आहेत. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, तिसरी लाट येऊ शकते पण ते कधी येईल, निश्‍चित सांगता येत नाही. ते जनतेवरच निर्भर आहे. जर आपण कोरोनाचे नियम व्यवस्थित पाळले तर आपल्याला कोरोनाची तिसरी लाट थोपवता येऊ शकेल. तसेच यावर लसीकरणसुद्धा रामबाण उपाय असल्याचे ते म्हणाले.

अनलॉकबाबत राजेश टोपे म्हणाले, आय.सी.एम.आरने पहिला रुग्ण आढळल्यापासून काही नियम आखून दिले आहेत. त्या नियमांनुसारच महाराष्ट्र सरकार काम करत आहे. आय.सी.एम.आरने सिरो सर्व्हे केला आहे. त्यानुसार त्यांनी आम्हाला सांगावे, प्रोटोकॉल द्यावा कशाप्रकारे निर्बंधामध्ये सूट देता येईल, तेसुद्धा सांगावे. या संदर्भात सूचना द्याव्यात. कारण आताच केंद्राची टिम येऊन गेली. त्यांनी निर्बंध पाळणे, टेस्टींग वाढवणे, अशा सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नियम पाळत आहे.

आय.सी.एम.आर.ने मार्गदर्शन केल्यास आम्हाला निर्णय घेता येईल. केंद्राने लसीकरणाचा वेग वाढवावा. महिन्या दोन महिन्यांतच राज्याचे लसीकरण १०० टक्के पूर्ण करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. पण त्या गतीनं लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नमूद केले. 
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com