‘महाभकास’ आघाडी झाली ‘गझनी’ : सुधीर मुनगंटीवार - mahabhakas aadhadi is becoe ghazni said sudhir mungantiwar | Politics Marathi News - Sarkarnama

‘महाभकास’ आघाडी झाली ‘गझनी’ : सुधीर मुनगंटीवार

निलेश डोये
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

संजय राऊत आधी काय बोलायचे ते समजत होते. हल्ली त्यांचे बोलणेही समजत नाही. त्यांचे वक्तव्य समजण्यासाठी रिसर्च इन्स्टीट्युट निर्माण करावी लागेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

नागपूर : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार महाभकास असून, वर्षभरात दिलेल्या आश्वासनांची आणि जाहीरनाम्यातील एकाही वचनाची पूर्ती केलेली नाही. हे राजकीय अल्झायमर झालेले सरकार आहे. सरकारची अवस्था गझनी सिनेमातल्या आमीर खानसारखी झाली आहे, अशी टीका माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे पत्रपरिषदेत केली. 

राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष झाल्यानिमित्त सरकारचे अपयश विषद करताना मुनगंटीवार म्हणाले, शिवसेनेने निवडणुकीत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात घरगुती वीज बिलात ३० टक्के सूट देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पाळले नाही. कोरोनाकाळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. तीही पूर्ण केली नाही. उलट कोरोनाच्या संकटात १ एप्रिलला विजेचे दार वाढवले. या सरकारने लोकांचा विश्वासघात केला. लॉकडाउनमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाल्याची कबुली मुनगंटीवार यांनी दिली. 

लोकांचे काम करण्याऐवजी हे सरकार सूड उगवत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा केंद्राकडे बोट दाखवून नुसते रडत आहे. हे सरकार रडणारे सरकार आहे. निधी नसल्याचे सांगत असताना दुसरीकडे गाड्या आणि दालनावर पैशाची उधळण होत आहे. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी विदर्भात पायसुद्धा ठेवला नाही, अशी टीकाही केली. राज्यातील सरकार पाडणे, हा आमचा अजेंडा नाही, ते टिकावे यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. हे सरकार स्वतःहूनच पडेल, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

राज्य सरकार नेहमी जीएसटीचे रडगाणे गात असते. कोरोनाच्या संकट काळात केंद्राने आतापर्यंत ६८ हजार २०९ कोटी रुपये दिले. जीएसटी नुकसानीचे पैसे सर्व राज्यांना मिळणारच आहे. यासाठी कर्ज काढायला सांगितले. परंतु, राज्य सरकार कर्ज काढायला तयार नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यावेळी महापौर संदीप जोशी, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदार विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, समीर मेघे, गिरीश व्यास, संदीप जोशी आदी उपस्थित होते. 

अधिवेशन घेण्यास टाळाटाळ 
सरकारने नागपूरला अधिवेशन न घेता नागपूर कराराचे उल्लंघन केले. आम्हाला सर्व मुद्द्यांवर सरकारकडून स्पष्टीकरण हवे आहे. सभागृह व्यासपीठ आहे. सरकारची अडचण होणार असल्याने अधिवेशन घेणे टाळत आहे. मुंबईतील अधिवेशनसुद्धा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव तयार करीत आहे. हिंमत असेल तर अधिवेशन ७ डिसेंबरपासून घेऊन दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले. 
 
महामंडळासाठी आमदारांचे खेटे आठ महिन्यांचा कालावधी होत असताना विदर्भ विकास महामंडळाला मुदतवाढ दिली नाही. आमदार स्वतःच्या फायद्याच्या फायली घेऊन मंत्रालयाच्या खेटे घालतात. त्यांनी या महामंडळाला मुदतवाढ मिळण्यासाठीही खेटे घालावे, असा टोलाही लगावला. 

राऊतांना समजण्यासाठी हवे रिसर्च सेंटर 
संजय राऊत आधी काय बोलायचे ते समजत होते. हल्ली त्यांचे बोलणेही समजत नाही. त्यांचे वक्तव्य समजण्यासाठी रिसर्च इन्स्टीट्युट निर्माण करावी लागेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख