looting bride preeti das quarantine in prison three staff to watch | Sarkarnama

"लुटेरी दुल्हन' प्रीती दास कारागृहात क्वारंटाईन, लक्ष ठेवण्यासाठी तीन कर्मचारी 

अनिल कांबळे 
सोमवार, 22 जून 2020

प्रीती दास ही हायप्रोफाईल व्यक्‍तिमत्व म्हणून समाजात वावरत होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत तिचे उठणे-बसणे होते. मात्र, तिला अटक होताच तिचे "वजन' घटले. तिला वाचविण्यासाठी धडपड करणारे काही कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीपासून दूरावाच ठेवला आहे. प्रीतीशी आपला काहीही संबंध नसल्याचे ते दर्शवित आहेत. अनेक कांडात सहकारी म्हणून असणारे युवा कार्यकर्ते आज अचानक गायब झाल्याचे दिसत आहे.

नागपूर : "लुटेरी दुल्हन' नावाने कुख्यात असलेली ठकबाज प्रीती दासला मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. कोरोनामुळे कारागृह प्रशासनाने प्रीतीला विशेष यार्डात क्वारंटाईन केले असून चित्यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन महिला जेल कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आल्याची माहीती सुत्रांनी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायप्रोफाईल गुन्हेगार प्रीती दासविरूद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत एकापाठोपाठ अनेक तक्रारी दाखल होत आहेत. तसेच स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी प्रीतीचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे तिच्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी प्रीती दासच्या फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला. पोलिस उपायुक्‍त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात प्रीती दासचा तपास होत असल्यामुळे आता प्रीतीशी संबंधित असलेल्या राजकीय आणि पोलिस खात्यात असलेल्या अनेकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. 

गुड्‌डू तिवारीला लग्नाचे आमिष दाखवून 14 लाख रूपयांनी फसवणूक केल्याप्रकरणात प्रीतीविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याच गुन्ह्यात प्रीतीला मध्यवर्ती कारागृहात जावे लागले आहे. जेल प्रशासनाने कोरोनाचे संकट पाहता प्रीतीला कारागृहातील एका विशेष यार्डात क्‍वॉरंटाईन केले आहे. प्रीतीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. आतापर्यंत "फाईव्ह स्टार' हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या प्रीती दासला जेलमधील कैद्यांसाठी बनविण्यात येणारे जेवण देण्यात येत आहे. तसेच कच्चा कैदी म्हणून तिला आता कारागृहात ठेवण्यात येणार आहे. 

प्रीतीचे "वजन' घटले 
प्रीती दास ही हायप्रोफाईल व्यक्‍तिमत्व म्हणून समाजात वावरत होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत तिचे उठणे-बसणे होते. मात्र, तिला अटक होताच तिचे "वजन' घटले. तिला वाचविण्यासाठी धडपड करणारे काही कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीपासून दूरावाच ठेवला आहे. प्रीतीशी आपला काहीही संबंध नसल्याचे ते दर्शवित आहेत. अनेक कांडात सहकारी म्हणून असणारे युवा कार्यकर्ते आज अचानक गायब झाल्याचे दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख