lockdown five parks and grounds will be open but strict lock down in restricted areas | Sarkarnama

लॉकडाऊन 5 : उद्याने व मैदाने होणार खुली, मात्र प्रतिबंधित क्षेत्रात कडक लॉकडाऊन 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 1 जून 2020

प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. चौथ्या लॉकडाउनमध्ये शहर रेड झोनमध्ये होते. आता पाचवा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला असला तरी रेड झोनमधील नागपूर शहरात काही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.

नागपूर : कोरोनाच्या लढ्यातील पाचवा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आल्यानंतर नागपूर शहरासाठी महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे काय निर्णय घेतात आणि कोणता आदेश काढतात, याकडे लोकप्रतिनिधी आणि शहरवासींचे लक्ष लागले होते. कारण गेल्या वेळी राज्य सरकारच्या निर्णयानंतरही त्यांनी शहर आणि ग्रामीणसाठी मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली नव्हती. पण आज काढलेल्या आदेशातून त्यांनी शहरवासींना दिलासा दिला आहे. 

प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागातील नागरिक, दुकानदार आणि खाजगी कार्यालयांना टप्प्या-टप्प्याने दिलासा देण्यात आला आहे. 3 जूनपासून शहरातील उद्याने, 5 जूनपासून रस्त्याच्या एका बाजूची पूर्ण दुकाने तर 8 जूनपासून खाजगी कार्यालये सुरू होतील. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र लॉकडाऊनचे कडक पालन केले जाणार असून तेथे कुठलीही सूट दिली नाही. राज्य सरकारने काल, रेड झोनमधील महापालिका क्षेत्रातही काही बाबींना टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे आदेश काढले. आज आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील दुकानदार तसेच नागरिकांना दिलासा देणारे आदेश काढले. याची अंमलबजावणी 3 जूनपासून होणार आहे. 

प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. चौथ्या लॉकडाउनमध्ये शहर रेड झोनमध्ये होते. आता पाचवा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढविण्यात आला असला तरी रेड झोनमधील नागपूर शहरात काही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 3 जूनपासून खाजगी, सरकारी मैदाने व उद्याने सुरू होणार आहेत. नागरिकांना सकाळी 5 ते सायंकाळी 7 या वेळात आरोग्याच्या दृष्टीने सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंगसाठी परवानगी आहे. मात्र मैदान आणि उद्यानांत समूहाने फिरणे, व्यायाम करण्यासारखी कुठलीच कृती करता येणार नाही. 

लहान मुलासोबत पालकांना राहणे बंधनकारक आहे. दुसऱ्या टप्प्यात 5 जूनपासून रस्त्याच्या एका बाजूची सर्व दुकाने दिवसाआड सुरू ठेवता येतील. यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतची वेळ निश्‍चित करण्यात आली आहे. टॅक्‍सी, कॅब आणि रिक्षा यांनाही 5 जूनपासून परवानगी असेल. मात्र यात चालक आणि दोन प्रवासी राहतील. खासगी कार्यालयांना 8 जूनपासून कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. 

3 जूनपासून हे होणार सुरूू 
- उद्याने, मैदाने सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. समुहाने फिरता येणार नाही. सायकलिंग, जॉगिंग, वॉकिंग करता येणार. 
- प्लंबर, इलेक्‍ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि इतर तांत्रिक कामांसाठी परवानगी. 
- गॅरेज सुरू होतील, परंतु गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल. 
- अत्यावश्‍यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के किंवा कमीतकमी 15 कर्मचाऱ्यांसह काम सुरू करता येईल 

5 जूनपासून दुसरा टप्पा 
- मार्केट कॉम्प्लेक्‍स, मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट वगळून सर्व दुकानांना परवानगी. 
- रस्त्याच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू राहतील. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. 
- कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहतील. कोणत्याही प्रकारचे कपडे बदलून किंवा परत घेता येणार नाही. 
- लोकांना जवळच्या दुकानांचा वापर करणे बंधनकारक. अत्यावश्‍यक नसलेल्या वस्तुंसाठी दूरच्या दुकानात जाण्यास परवानगी नाही. 
- टॅक्‍सी, कॅब आणि रिक्षाला चालक आणि दोन प्रवाशांसह परवानगी. दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल. 

8 पासून तिसरा टप्पा 
- तिसऱ्या टप्प्यात खाजगी कार्यालयांना केवळ 10 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास परवानगी. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. 
- ऍम्बुलन्स, डॉक्‍टर, नर्स, वैद्यकीय क्षेत्रातील अधिकाऱ्यांना राज्यात, राज्याबाहेर कुठेही प्रवासाला परवानगी. 

हे बंदच राहील 
- हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल, शाळा, कॉलेज, प्रशिक्षण संस्था, मेट्रो रेल्वे, शहर बससेवा, सिनेमा थिएटर, सभागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्युटी पार्लर. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख