भंडारा : जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात दरवर्षी जवळपास 50 कोटी रुपयांची रेती चोरी होते, तर संपूर्ण जिल्ह्यात जवळपास १००० कोटी रुपयांची रेती चोरी होते. मोठ्या संख्येने तक्रारी झाल्या असताना फक्त तीनच प्रकरणांमध्ये कारवाई का, असा प्रश्न करीत सरकारकडून काहीच कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी केला.
जिल्ह्यातील रेती चोरी प्रकरणांत मंत्र्यांनी दिलेली उत्तरे चुकीची आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. एका तालुक्यातून रोज ५०० ट्रक रेत चोरी होते, या संदर्भात मी संबंधित अधिकाऱ्यांना १० पत्रे पाठविलीत. पण यावर कोणतेही उत्तर दिले नाही किंवा कारवाई केलेली नाही. उलट संबंधित अधिकारी म्हणतात, ‘राजाचं चोर आहे तर आज चौकीदार काय करणार?’ अधिकाऱ्यांच्या या उत्तरावरून कोट्यवधींची रेती चोरी कुणाच्या आशीर्वादाने होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही काल सभागृहात डॉ. फुके म्हणाले.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. डॉ. फुके सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसले. त्यातच मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना धारेवर धरले. ते म्हणाले की, मंत्री महोदयांनी रेती चोरी प्रकरणात दिलेली उत्तरे चुकीची असून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नाही. या विरोधात विधानसभेचे २ आमदार उपोषणाला बसले आहेत. त्याचाही परिणाम सरकारवर झालेला नाही. सभागृहात दिलेली उत्तरे चुकीची आहेत. सन २०१९-२० मध्ये त्यांनी ३७ प्रकरणं सांगितले आहेत. भंडारा जिल्ह्यात ६२ कोटी रुपये वसूल केले, असे सांगितले आहे. म्हणजे त्यांनी एका प्रकरणामध्ये २ कोटी रुपये त्यांनी वसूल केले का? एक टिप्पर किंवा ट्रॅक्टरचे दोन कोटी रुपये वसूल केले का, असा प्रश्न त्यांनी विचारला.
२०२०-२१ मध्ये २३ प्रकरणं झालीत आणि त्यामध्ये ३२ कोटी रुपये वसूल केल्याचे मंत्री महोदयांनी आपल्या उत्तरात सांगितले. त्यांनी दिलेली सर्व माहिती चुकीची आहे. माझ्याकडे सर्व आकडेवारी आहे. २०१८-१९ मध्ये २७५ प्रकरणं २ कोटी ९९ लाख २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. २०१९-२० मध्ये ३१३ प्रकरणं पकडले गेले आणि ४ कोटी ५३ लाख ९६ रुपये दंड वसूल करण्यात आला. २०२०-२१ पर्यंत जवळपास १८३ प्रकरणं पकडले गेले आणि २ कोटी २४ लाख रुपये वसूल करण्यात आले. सभागृहात दिली गेलेली माहिती पूर्णतः चुकीची असल्याचा स्पष्ट आरोप डॉ. फुके यांनी केला.
भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही सामान्य माणसाला जरी विचारले तर तो हेच सांगेल की, तहसील कार्यालयातील चपराश्यापासून ते मंत्रालयातील बड्या व्यक्तीपर्यंत रेती तस्करीचा मलिदा पोहोचतो. एकट्या तुमसर तालुक्यातून रोज ५०० ट्रक रेती चोरी होते. हे ट्रक सर्रास रस्त्यांवरून जात असतात. हे सर्व जिल्हा प्रशासनाला दिसत नाही काय, असा प्रश्न विचारत डॉ. फुके यांनी संताप व्यक्त केला.
Edited By : Atul Mehere

