निर्यात वाढविणे, हाच आत्मनिर्भर होण्याचा मार्ग : नितीन गडकरी - increasing exports is the way to become self reliant said nitin gadkari | Politics Marathi News - Sarkarnama

निर्यात वाढविणे, हाच आत्मनिर्भर होण्याचा मार्ग : नितीन गडकरी

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून अनेक चांगली उत्पादने तयार करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. आता तर खादी ग्रामोद्योगने महिला आणि पुरुषांसाठी आकर्षक पादत्राणे बनविली आहेत. त्यांनाही खूप मागणी आहे. आमचा विभाग आता मध, बांबू यावर काम करीत आहे.

नागपूर : देशात सध्या उद्योगांमध्ये यशस्वी महिला उद्योजिकांची संख्या ८० लाख असून येत्या ५ वर्षात महिला उद्योजिकांची संख्या २ कोटींपर्यंत नेण्याचे आमचे प्रयत्न आहे. त्यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून आम्ही नवीन उद्योजिकांना मदत करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आयात कमी करून निर्यात वाढविणे, हाच आत्मनिर्भर होण्याचा मार्ग असल्याचेही ते म्हणाले. 

स्त्री उद्यमी फाऊंडेशनच्या वतीने महिला उद्योजिका मेळाव्यात ना. गडकरी महिला उद्योजिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) आज कमी आहे. जीडीपी वाढविण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी व ग्रामीण आणि मागास भागाचा औद्योगिक विकास झाला तर जीडीपी वाढेल. आज ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था फक्त ८० हजार कोटींची आहे. ती ५ लाख कोटींपर्यंत नेण्याची गरज असल्यामुळे महिला उद्योजिकांनी आता ग्रामीण भागात उद्योग सुरु करून त्या भागाचा विकास आणि सोबतच महिला सशक्तीकरण करणे गरजेचे आहे. 

ग्रामीण भागात उपलब्ध कच्च्या मालावर आधारित उद्योग सुरु होऊ शकतात, ते सुरु केले पाहिजे. देशात कच्चा माल उपलब्ध आहे. कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ आहे, उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्यामुळे ग्रामीण भागात तेथील कच्च्या मालावर आधारित उद्योग सुरु होऊ शकतात. आमच्याकडे विविध कला अवगत असलेले कलाकार आहेत, पण त्यांच्या कलेला वाव मिळत नाही. सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग विभागामार्फत शासन या कलाकारांच्या कलेला वाव आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

ना. गडकरी म्हणाले, उद्योजिकांनी आपले उत्पादन निर्यातयोग्य तयार करावे. उत्पादनाच्या दर्जाशी कोणतीही तडजोड नको. वेळेत माल पोहोचणे, आकर्षक पॅकेजिंग आणि किंमत कमी करण्याचा प्रयत्न केल्यास आपले उत्पादन निर्यातयोग्य होईल. आयात कमी करून निर्यातीस अधिक प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका आहे. ग्रामीण भागात विविध लघु उद्योगांचे समूह तयार करून त्या भागाचा विकास करणे, रोजगाराची निर्मिती करणे, आयात कमी करून निर्यात वाढविणे, हाच आत्मनिर्भर होण्याचा मार्ग आहे, असेही ना. गडकरी म्हणाले. 

हातमाग, हस्त-कलाकारांना प्रोत्साहन 
ग्रामीण भागातील हातमाग उद्योग व हस्तकलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठ़ी प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असून त्यासाठी एमएसएमईच्या माध्यमातून मदत करण्याचे आपले प्रयत्न असल्याचे केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. ‘झमक’ या हस्तकला साहित्याच्या प्रदर्शनीचे ई उद्घाटन करताना ना. गडकरी बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, हस्तकलाकारांना एकत्र आणून एमएसएमईच्या स्फूर्ती योजनेत १० कोटी रुपयांपर्यंत मदत त्यांना करता येईल. अशा लहान उद्योगांचे समूह बनविले तर हस्तकलाकारांना चांगले काम मिळेल.
 
खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून अनेक चांगली उत्पादने तयार करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. आता तर खादी ग्रामोद्योगने महिला आणि पुरुषांसाठी आकर्षक पादत्राणे बनविली आहेत. त्यांनाही खूप मागणी आहे. आमचा विभाग आता मध, बांबू यावर काम करीत आहे. आगामी काळात ग्रामीण अर्थव्यवस्था ८० हजार कोटींवरून ५ लाख कोटींपर्यंत नेण्याचे आमचे प्रयत्न असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.              (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख