if you want cut our full salary but do not reduce it in kovids fund said mp rana | Sarkarnama

हवा असेल आमचा पूर्ण पगार कपात करा, पण कोविडच्या फंडात कमी नका करू : खासदार राणा

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडविताना अडचणी निर्माण होत आहेत व लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे इतर खर्चांमध्ये कपात करून स्थानिक लोकांच्या सेवेसाठी पूर्ण खासदार निधी वापरण्याची मुभा मिळावी, अशी आग्रही मागणी आज खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत केली.

नागपूर : हवे तर आमचा खासदारकीचा पूर्ण पगार कपात करून कोविड 19 फंडात घ्या, पण खासदार निधीत कपात करू नका. मतदार संघातील जनतेच्या आरोग्य विषयक व इतर समस्या सोडविण्यासाठी पूर्ण खासदार निधी द्या, अशी रोखठोक मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत केली. लोकसभा अधिवेशनाच्या आज दुसऱ्या दिवशी खासदार वेतन-भत्ते व निवृत्ती वेतन सुधारणा विधेयकावर चर्चा करताना एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्य़ाला खासदार नवनीत रवी राणा यांनी हात घातला व त्यावर सडेतोडपणे सभागृहात आपले म्हणणे मांडले.

संपूर्ण देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. यासाठी खासदार वेतनातून व इतर भत्ते तसेच निवृत्ती वेतन यामधून 30 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव आहे. या विधेयकाच्या समर्थनार्थ बोलताना खासदार नवनीत रवी राणा यांनी पीठासीन सभापतींना विनंती केली की खासदार म्हणून आपल्याला मिळणारे वेतन व इतर भत्ते पूर्ण कपात करून कोविड 19 साठी वापरा. परंतु मतदार संघाच्या विकासासाठी आम्हाला मिळणार वार्षिक 5 कोटी रुपयांचा खासदार निधी पूर्ण द्या. कारण हा निधी स्थानिक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी, रुग्णवाहिका घेण्यासाठी व मतदार संघातील इतर आवश्यक विकासकामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो.

सद्यःस्थितीत जिल्हाधिकारी सांगतात की केंद्र शासनाचे नवीन निर्देश व मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सध्या खासदार निधीचा वापर करता येणार नाही. त्यामुळे मतदारसंघातील प्रलंबित समस्या सोडविताना अडचणी निर्माण होत आहेत व लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे इतर खर्चांमध्ये कपात करून स्थानिक लोकांच्या सेवेसाठी पूर्ण खासदार निधी वापरण्याची मुभा मिळावी, अशी आग्रही मागणी आज खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेत केली. सोबतच या महामारीत आपण आपला खासदारकीचा संपूर्ण पगार देण्यासाठी तयार आहोत व इतर खासदारांनी सुद्धा आपला पगार द्यावा, अशी सूचनाही त्यांनी सभागृहात केली.                     (Edited By : Atul Mehere) 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख