सरकारने तेव्हाच ऐकले असते, तर आज हे हाल झाले नसते... - if the government had listen that time it would not have happend today | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारने तेव्हाच ऐकले असते, तर आज हे हाल झाले नसते...

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

ऑक्सिजनची परिस्थिती सध्या आणीबाणीची झाली आहे. आपल्याला एलजी प्लांट सुरू झाले नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलही तुमच्यावर जबाबदारी टाकून मोकळे होतील. ऑक्सिजन मिळणे हे व्यवस्थेचे काम असतं. हे काही कुठे प्रायव्हेटमध्ये मिळत नाही.

अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत होरपळून निघत असलेल्या राज्यात ऑक्सिजनची आणीबाणी निर्माण झाली आहे. या परिस्थितीबाबत माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सप्टेंबर २०२० मध्येच विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेमध्ये ऑक्सिजनच्या आणीबाणीबाबत इशारा दिला होता. त्यावेळी त्यांनी सरकारला १५ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा सल्लाही दिला होता. त्यानुसार सरकारने कार्यवाही केली असती तर आज राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला नसता. याबाबत त्यांनी विधान परिषदेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावरून चांगलाच व्हायरल होतो आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये राज्यातील कोरोनाची पहिली लाट बऱ्याच प्रमाणात ओसरत आली होती. त्याकाळात झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात कोरोना संकट काळाने निर्माण झालेल्या परिस्थितीवर विधान परिषदेत झालेल्या चर्चेत सहभाग घेताना आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी ऑक्सिजन उपलब्धतेबाबत इशारा दिला होता. वैद्यकीय क्षेत्रातून असल्यामुळे वेगवेगळ्या डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज्यातील ऑक्सिजन उपलब्धतेची स्थिती त्यावेळीच गंभीर वळणावर असल्याचा इशाराही डॉ. पाटील यांनी दिला होता. त्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये किमान १५ ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचा सल्ला दिला होता. राजकारण बाजूला ठेवून त्यावेळी या उपाययोजनेबाबत गांभीर्याने विचार करण्यात आला असता तर सध्या राज्य सरकार ऑक्सिजन मिळविण्यासाठी जी धावपळ करीत आहे आणि रुग्णांचे ऑक्सिजन अभावी हाल सुरू आहेत ते कदाचित थांबविता आले असते.

विधान परिषदेत काय म्हणाले होते डॉ. पाटील?
ऑक्सिजनची परिस्थिती सध्या आणीबाणीची झाली आहे. आपल्याला एलजी प्लांट सुरू झाले नाही तर प्रायव्हेट हॉस्पिटलही तुमच्यावर जबाबदारी टाकून मोकळे होतील. ऑक्सिजन मिळणे हे व्यवस्थेचे काम असतं. हे काही कुठे प्रायव्हेटमध्ये मिळत नाही आणि म्हणून एलजी प्लांट उभे झाले नाही तर पुन्हा एकदा आणीबाणीला सामोरे जावे लागेल. व्हेंटिलेटर, ड्रग्स असून चालणार नाही. एसपीओ काऊंट ज्याचा ९२ पेक्षा खाली जातो तेव्हा ऑक्सिजन उपचाराशिवाय पर्याय नसतो. तेव्हा माझी विनंती राहील की एलजी प्लांट १५ ठिकाणी कार्यान्वित झाले पाहिजे. एका एलजी प्लांटमधून ९०० सिलिंडर भरले जातात. त्यामुळे किमान एवढे तरी प्लांट उभे झाले पाहिजे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख