husband wife tension increased by forty percent in lockdown said raja akash | Sarkarnama

लॉकडाऊनमध्ये चाळीस टक्‍क्‍यांनी वाढला पती-पत्नीतील तणाव : प्रा. राजा आकाश 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 1 जून 2020

कामानिमित्त व्यक्ती आठ ते 10 तास घराबाहेर राहू शकत होता. परंतु, या काळात नवरा-बायको दोघेही पूर्ण वेळ घरीच असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या सर्व समस्या जोडप्यांना कुणाजवळ व्यक्तसुद्धा करता येत नाही.

नागपूर : लॉकडाउनमध्ये तणावात जगणाऱ्या पती-पत्नीला व्यक्त होता येत नाही. त्यांच्यामधील तणाव आतल्या आत धुमसतो आहे. समुपदेशन करावे, असे अनेक जोडप्यांना वाटते. मात्र, कोरोनाच्या भीतीने ही जोडपी समुपदेशनासाठी यायला तयार नाहीत. चाळीस ते पन्नास टक्‍क्‍यांपर्यंत जोडप्यांमधील ही समस्या वाढली आहे, असे मत कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. 

देशामध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर कौटुंबिक न्यायालयातील कामकाज थांबले. त्यामुळे, कौटुंबिक कलहामुळे तणावात जगणाऱ्या जोडप्यांचे प्रमाणसुद्धा वाढल्याचे मत प्रा. राजा आकाश यांनी व्यक्त केले. अशा जोडप्यांच्या समस्यांचे वेळेत समाधान न झाल्यास अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होतील. स्वभाव न जुळणे, संशयी वृत्ती, सासू सासऱ्यांशी न पटणे, छोट्या-छोट्या कारणांवरून वाद होणे, अपेक्षा, अहंकार अशा विविध कारणांमुळे जोडप्यांमध्ये खटके उडत असतात. लॉकडाउन सुरू होण्यापूर्वीदेखील याच कारणांमुळे जोडप्यांमध्ये तणाव निर्माण व्हायचा. मात्र, याचे प्रमाण लॉकडाउनमध्ये वाढले आहे. 

शिवाय, कामानिमित्त व्यक्ती आठ ते 10 तास घराबाहेर राहू शकत होता. परंतु, या काळात नवरा-बायको दोघेही पूर्ण वेळ घरीच असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, या सर्व समस्या जोडप्यांना कुणाजवळ व्यक्तसुद्धा करता येत नाही. चीन आणि अमेरिकेमध्ये लॉकडाउन हटविल्यानंतर अनेक जोडप्यांनी घटस्फोट घेतला. अशा पती-पत्नीचे वेळेत समुपदेशन न केल्यास भारतातदेखील हीच परिस्थिती उद्‌भवू शकते. अशा प्रकरणांमध्ये तणाव वाढत गेल्यास नवऱ्याला क्वारंटाइन करण्याचा निर्णयसुद्धा पुणे जिल्हा परिषदेमध्ये घेतला आहे. हीच परिस्थिती नागपूर शहरात उद्‌भवल्यास स्थानिक प्रशासन हा पर्याय निवडण्याची शक्‍यता आहे, असेही प्रा. राजा आकाश म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख