चौकशी सुरू असलेला शिक्षक ‘आदर्श’ कसा? ईओ, बीईओंना शो कॉज !

शिक्षण सभापती पाटील यांनी कोणत्याही प्रकारची नियमबाह्य निवड झाली नसल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरला. त्यामुळे आता संबंधित शिक्षकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली आहे.
ZP Nagpur
ZP Nagpur

नागपूर : गैरव्यवहाराचे आरोप किंवा कुठलीही विभागीय चौकशी सुरू असलेल्या शिक्षकाची निवड आदर्श पुरस्कारासाठी करता येत नाही, हा नियम आहे. परंतु अशाच एका शिक्षकाची निवड आदर्श पुरस्कारासाठी करण्यात आली. याप्रकरणी शिक्षणाधिकारी, रामटेकचे गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधून दरवर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने जि. प. शाळांमधील शिक्षकांना 'आदर्श शिक्षक' पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. प्राथमिक गटातून १३ व माध्यमिक गटातून २ अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यंदाही या पुरस्कारासाठी शिक्षण विभागाकडे एकूण ३९ प्रस्ताव आले होते. यांपैकी ३६ प्राथमिक साठी तर ३ माध्यमिक गटासाठी आले होते. आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकाची निवड करताना काही निकष आहेत. यात गैरव्यवहाराचे आरोप आणि विभागीय चौकशी सुरू नसणे महत्त्वाचे आहे. परंतु या निकषाला डावलून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्कारासाठी जिल्हा परिषदने निवड केली. 

काही पात्र शिक्षकांना डावलल्याचीही ओरड होत असल्याने निवड प्रक्रियेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. शिक्षण सभापती पाटील यांनी कोणत्याही प्रकारची नियमबाह्य निवड झाली नसल्याचा दावा केला होता. परंतु त्यांचा दावा फोल ठरला. त्यामुळे आता संबंधित शिक्षकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागीय चौकशी सुरू असताना प्रस्ताव समितीसमोर पाठविणे चुकीचे आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली. गटविकास अधिकाऱ्यांचाही यात दोष आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगण्यात आल्याची माहिती आहे.
(Edited By : Atul Mehere) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com