चंद्रपूर पोलिस अधीक्षकांच्या नावेच पैसे मागण्याचा प्रकार.... - how to ask for money in the name of chandrapur superintendent of police | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

चंद्रपूर पोलिस अधीक्षकांच्या नावेच पैसे मागण्याचा प्रकार....

प्रमोद काकडे
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

ताजा प्रकार याच मालिकेत झाला असून पोलिसांनी मात्र एकदा फ्रेंड असलेल्या मित्राची पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्याची पडताळणी करण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहे. अशा प्रकारे बनावट फेसबूक तयार करून पैशाची मागणी अथवा रक्कम लंपास करणाऱ्यांच्या विरोधात चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.

चंद्रपूर : सोशल मिडीयाचा प्रभाव जसजसा वाढत गेला, तसतशी पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा चर्चेत येऊ लागली. त्यातल्या त्यात चंद्रपूर सायबर गुन्हे शाखेची कामगिरी अव्वल आहे. या शाखेने अतिषय क्लिष्ट प्रकरणांचा तपास करून शेकडो आरोपींना आजवर गजाआड केले. पण त्यांच्याही नाकावर टिच्चून गुन्हेगारांनी चक्क चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांच्या नावाने फेसबूक आयडी तयार करुन लोकांना पैशांची मागणी केली. हे प्रकरण उडेडात आल्यानंतर सायबर शाखेने या गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी कसून तपास सुरू केला आहे. 

चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा विभाग अतिशय सक्षम समजला जातो. आजवर सायबर गुन्हे शाखेने अनेक क्लिष्ट प्रकरणे उजेडात आणली आहेत, तर शेकडो प्रकरणात आरोपींना जबर शिक्षा झाली आहे. मात्र ताजा गुन्हा चक्क जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांच्या बाबतीतच घडला आहे. सायबर गुन्हेगारांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावाचे बनावट फेसबूक आयडी तयार करत लोकांना त्यावर जोडणे सुरू केले. या फेसबूक खात्याच्या माध्यमातून नागरिकांना पैशाची मागणी केली गेली असून, त्यासाठी विविध कारणे पुढे केली गेली. 

दरम्यान अशाप्रकारे पैशाची मागणी करणारे काही कॉल्स या फेसबूक अकाउंटशी जोडले गेलेल्या नागरिकांना आल्यानंतर त्यांनी खुद्द पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिली. त्यातून हा प्रकार उजेडात आला आहे. चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या सायबर गुन्हेगारांविरोधात आता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, असे बनावट फेसबूक खाते तयार करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. गेले काही दिवस आधीच मित्र असलेल्या अनेक फेसबूक खातेदारांमध्ये पुन्हा पुन्हा नव्या खात्याच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट येत असून त्यामुळे फेसबुक वापरकर्त्यात संभ्रम निर्माण झाला आहे. 

ताजा प्रकार याच मालिकेत झाला असून पोलिसांनी मात्र एकदा फ्रेंड असलेल्या मित्राची पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्याची पडताळणी करण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहे. अशा प्रकारे बनावट फेसबूक तयार करून पैशाची मागणी अथवा रक्कम लंपास करणाऱ्यांच्या विरोधात चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख