गृहमंत्र्यांनी आरोप सिद्ध करावे, अन्यथा जाहीर माफी मागावी : बावनकुळेंचे आव्हान - home minister should prove the allegations otherwise he should issue a public apology bavankules challenge | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्र्यांनी आरोप सिद्ध करावे, अन्यथा जाहीर माफी मागावी : बावनकुळेंचे आव्हान

अभिजित घोरमारे
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

ऊर्जा खात्याचे मंत्री डॉ. नितीन राऊत कॉंग्रेसचे असल्याने महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांचे नेते त्यांना अडचणीत आणण्यात कुठलीही कसर सोडत नाहीये. परिवहन विभागाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एक हजार कोटी दिले जातात, तर मग ऊर्जा विभागाला वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी पैसा का दिला जात नाही.

भंडारा : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी माझ्याविरोधात जे काही आरोप केले, ते केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे अवैध धंदे मी उघडकीस आणले म्हणून ते माझ्यावर बेताल आरोप करीत सुटले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख आणि सरकारने संपूर्ण चौकशी करावी आणि आरोप सिद्ध करावे, जनतेसमोर रिपोर्ट सादर करावा, अन्यथा जाहीर माफी मागावी. यासाठी मी त्यांना तीन महिन्यांचा वेळ देत असल्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज म्हणाले.

पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ ते आज भंडाऱ्याला आले असताना पत्रकारांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे यांना कोल वॉशरीचे ठेके आणि त्यांनी केलेली विदेशी गुंतवणूक भोवली असून ईडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी बावनकुळे आता पक्ष श्रेष्ठींची खुशामत करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रवक्ते प्रवीण कुंटे यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे अवैध धंदे उघड केल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न ते करत असल्याच्या आरोप बावनकुळेंनी केला असून सरकार यांची असल्याने तीन महिन्यांत आरोप सिद्ध करावा, नाही तर जाहीर माफी मागावी, असे खडे बोलही त्यांनी सरकारला सुनावले आहे. 

पाच मिनिटांत सुटू शकतो वीज बिलांचा प्रश्‍न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनावर घेतल्यास राज्यभर पेटत असलेला वाढीव वीज बिलांचा प्रश्‍न पाच मिनिटांत सुटू शकतो आणि जनता सुटकेचा श्‍वास सोडू शकते. पण यांना तो सोडवायचा नाहीये, तर त्याचे राजकारण करायचे आहे. ऊर्जा खात्याचे मंत्री डॉ. नितीन राऊत कॉंग्रेसचे असल्याने महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांचे नेते त्यांना अडचणीत आणण्यात कुठलीही कसर सोडत नाहीये. परिवहन विभागाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एक हजार कोटी दिले जातात, तर मग ऊर्जा विभागाला वाढीव वीज बिल माफ करण्यासाठी पैसा का दिला जात नाही, असा प्रश्‍न उपस्थित करून चळवळीतून वर आलेल्या डॉ. नितीन राऊत यांना बदनाम करण्यासाठी घाणेरडे राजकारण केले जात आहे. ही बदनामी झेलण्यापेक्षा ऊर्जामंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे केव्हाही योग्य राहील, असे श्री बावनकुळे म्हणाले.  

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख