गृहमंत्री देशमुख यांच्या ‘या’ वक्तव्याने उडाली खळबळ - home minister deshmukhs this statement causes a stir | Politics Marathi News - Sarkarnama

गृहमंत्री देशमुख यांच्या ‘या’ वक्तव्याने उडाली खळबळ

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

गृहमंत्री देशमुख यांनी आज भाजपचे नेते संपर्कात असल्याचे म्हटले असले तरी पक्षांतर बंदीचा कायदा असल्याने कोणत्याही पक्षाच्या सदस्याला पक्षाबाहेर पडता येणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहे.

नागपूर : भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ यांसह प्रत्येक जिल्ह्यांतील भाजपचे नेते आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी ते दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात वर्धा येथे त्यांनी उपरोक्त वक्तव्य केले. 

पुण्यातील १९ नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देतील, अशीही चर्चा काल राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून फक्त वातावरणनिर्मितीसाठी, असे वक्तव्य केले जात आहे. भाजपचे कार्यकर्ते भाजपसोबत एकनिष्ठ आहेत. त्यामुळे एकही कार्यकर्ता भाजपला सोडून जाणार नाही, असे भाजपकडून सांगितले जाते. आता अनिल देशमुखांनी याबाबत वक्तव्य केले आहे. मात्र, त्यांचे वक्तव्य किती खरे ठरते, हे येणारा काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

गृहमंत्री देशमुख यांनी आज भाजपचे नेते संपर्कात असल्याचे म्हटले असले तरी पक्षांतर बंदीचा कायदा असल्याने कोणत्याही पक्षाच्या सदस्याला पक्षाबाहेर पडता येणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात खरोखरच भाजपचे नेते आहेत की फक्त वातावरण निर्मितीसाठी त्यांनी हे वक्तव्य केले, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही पक्ष विस्तारासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मोठा भाऊ आहे, असे सांगत त्यांनी विस्ताराचा कार्यक्रम सुरू केला. विदर्भात पक्षविस्ताराची जबाबदारी पटेल आणि देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे महिला प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्षपद विदर्भाला देऊन कॉंग्रेसनेही विदर्भावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमकपणे पक्षविस्तारासाठी काम करत आहे. त्यामुळे आता दावे प्रतिदावे होणारच, असे जाणकारांचे मत आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख