‘या’ कारणासाठी संतापले गृहमंत्री अनिल देशमुख, अधिकाऱ्यांना खडसावले.. - home minister anil deshmukh gets angry for this reason and scolds the officials . | Politics Marathi News - Sarkarnama

‘या’ कारणासाठी संतापले गृहमंत्री अनिल देशमुख, अधिकाऱ्यांना खडसावले..

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

25 नोव्हेंबरपर्यंत सर्व केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू करावी, असे निर्देश त्यांनी पणन अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे नवीन केंद्रांना मंजुरी द्यावयाची झाल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचना गृहमंत्र्यांनी केल्या.

नागपूर : गोंदिया जिल्हात धान खरेदी करण्यासाठी होत असलेल्या उशिरामुळे पालकमंत्री अनिल देशमुख चांगलेच संतापले आणि  अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दिवाळी संपली तरी अद्याप धान खरेदी सुरू का करण्यात आली नाही, याचा जाब यावेळी अनिल देशमुख यांनी विचारला. २५ नोव्हेबरपर्यत सर्व धान खरेदी केंद्र सुरू करा. तसेच २८ नोव्हेंबरला मी स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत गोंदिया येथे येऊन किती खरेदी झाली याचा आढावा घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

 
जिल्ह्यातील धान खरेदीचा आढावा ऑनलाइन बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सहसराम कोरटे, जिल्हाधिकारी दिपककुमार मीना, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराम वानखेडे, जिल्हा पणन अधिकारी भारत भूषण पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक अविनाश राठोड, अतुल नेरकर, राजू जैन यावेळी उपस्थित होते. 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पणन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात 70 धान खरेदी केंद्रांना व आदिवासी विकास महामंडळाच्या क्षेत्रात 44 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे. 

असे असताना 22 नोव्हेंबरपर्यंत पणन अधिकाऱ्यांनी 41 केंद्रांवर 21 हजार क्विंटल तर आदिवासी विकास महामंडळाने 3 केंद्रावर 2 हजार क्विंटल धान खरेदी केले. यामुळे शेतकऱ्यांचे धान खरेदीविना पडून असून त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व केंद्रावर शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी सुरू करावी, असे निर्देश त्यांनी पणन अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे नवीन केंद्रांना मंजुरी द्यावयाची झाल्यास तसे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख