दीपाली चव्हाण यांच्या घरासमोर रेड्डी व शिवकुमारच्या फोटोंची केली होळी…

दीपालीच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शिवकुमार आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या फोटोंना चपलांचे हार घालून होळीत दहन करण्यात आले. येथे उपस्थित महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात रेड्डी आणि शिवकुमार मुर्दाबादचे नारे लावत जोरदार घोषणाबाजी केली.
Deepali Chavan House Holi
Deepali Chavan House Holi

अमरावती : मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने समाजमन सुन्न झाले आहे. मृत्यूनंतरही त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सुचेल त्या मार्गाने आरोपींना शिक्षेची मागणी करीत निषेध केला जात आहे. काल सायंकाळी दीपाली यांच्या घरासमोर होळीमध्ये श्रीनिवास रेड्डी आणि विनोद शिवकुमार यांचे फोटो होळीत जाळण्यात आले. 

मेळघाटातील हरिसाल येथील दीपाली यांच्या शासकीय निवासस्थानासमोर काल होळी पेटवण्यात आली. त्यामध्ये दीपालीच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शिवकुमार आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रमुख मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या फोटोंना चपलांचे हार घालून होळीत दहन करण्यात आले. येथे उपस्थित महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात रेड्डी आणि शिवकुमार मुर्दाबादचे नारे लावत जोरदार घोषणाबाजी केली. दीपाली यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

आज धुळवडीचा दिवस असल्याने आणि कोरोनाचे कडक नियम लागू केलेले आहेत. त्यामुळे आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी लोकांचा आवाज शांत वाटत असला तरी उद्यापासून या मागणीसाठी खासदार व आमदार राणा दाम्पत्य आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती आहे. दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी धारणी न्यायालयाने विनोद शिवकुमार याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची कालची रात्र लॉकअपमध्ये गेली. आजही त्याला लॉकअपमध्येच ठेवण्यात येणार आहे. धारणी पोलिसांनी काल त्याच्या शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी कालपासूनच तपासाला सुरुवात केली आहे. विविध दिशेने पोलिसांचा तपास सुरू असून त्यात मोबाईल व लॅपटॉपची तपासणी करण्यात आली. सोबतच अन्य माहितीसुद्धा गोळा करण्यात येत आहे. 

काल दुपारी धारणी पोलिसांचे एक पथक विनोद शिवकुमारच्या चिखलदरा येथील बंगल्याच्या तपासणीकरिता गेले होते. त्यांनी बंगल्याची कसून तपासणी केली. या पथकात मोर्शीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूनम पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत गीते, पोलिस कॉन्स्टेबल सचिन होले यांच्यासह धारणी पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या झडतीत काय हाती लागले, याची माहिती मात्र पोलिसांनी सध्या दिलेली नाही. तपासाच्या दृष्टीने आवश्‍यक त्या बाबी तपासण्यात आल्या असून योग्य वेळी माहिती दिली जाईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या पत्रात काही लोक वरिष्ठांचे कान भरत असल्याने आपला त्रास वाढल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे लोक कोण आहेत, याचा शोधसुद्धा धारणी पोलिस घेत आहेत. अशा लोकांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. 
Edited By : Atul Mehere 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com