he wants to be a gangster so he fired | Sarkarnama

त्याला बनायचं आहे गॅंगस्टर, म्हणून केला गोळीबार…

अनिल कांबळे
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

पुनेश ठाकरे हा गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याला गुंडांची गॅंग तयार करून गॅंगस्टर बनायचे आहे. त्यामुळे त्याने उत्तरप्रदेशातून पिस्तूल विकत आणली तर नागपुरातून तलवार, चाकू, कुकरी विकत घेतले. टोळी तयार केली. आता फक्त एखाद्याचा गेम करून ‘फ्लॅश’मध्ये यायचे होते.

नागपूर : संपूर्ण जग कोरोनाच्या दहशतीत असताना कुणाला आपली दहशत पसरवावी, असं वाटत असेल तर त्याला काय म्हणावं? आणि गॅंगस्टर बनने हे कुणाचं ध्येय असू शकतं का, असा प्रश्‍न उपस्थित करणारी घटना शहरात परवा रात्री घडली. एका युवकाला गॅंगस्टर बनायचं आहे म्हणून त्याने बेछूट गोळीबार केला. या युवकाला त्याच्या पाच साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. 

जरीपटक्यातील गोळीबार घटनेतील आरोपी पुनेश ठाकरे हा गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. त्याला गुंडांची गॅंग तयार करून गॅंगस्टर बनायचे आहे. त्यामुळे त्याने उत्तरप्रदेशातून पिस्तूल विकत आणली तर नागपुरातून तलवार, चाकू, कुकरी विकत घेतले. टोळी तयार केली. आता फक्त एखाद्याचा गेम करून ‘फ्लॅश’मध्ये यायचे होते. त्यासाठीच पुनेशने गोळीबार केल्याची माहिती आहे. जरीपटक्यातील हुडको कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. तर दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बंदुकीसह धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश राजू पाटील (रा. अहुजानगर, हुडको कॉलनी) रविवारी रात्री कारने घरी जात होता. मिसाळ ले-आउटमध्ये आरोपी पूनेश ठाकरे, मनोज कहाळकर, प्रज्ज्वल शामराव पौनीकर, शुभम राजू नरांजे, आसिफ कुरेशी आणि अन्य दोन १७ वर्षांची मुले रस्त्यात दुचाकी लावून मस्ती करीत होते. कार काढण्यासाठी जागा नसल्यामुळे पलाशने त्यांना ‘अबे समजता नही क्या?, ये जगा है क्या बात करणे की, गाडी बाजू करो’ असे हटकले. चिडलेल्या आरोपींनी दादागिरी दाखविण्यासाठी पलाशला मारहाण केली. पलाश त्यांना धमकी देऊन निघून गेला. आरोपींनी वचपा काढण्यासाठी पाठलाग करून पलाशचे घर गाठले. पलाशचा भाऊ प्रितेश राजू पाटील (२६) घराबाहेर आला. त्याने युवकांना जाब विचारला. दरम्यान, एकाने पिस्तूल काढून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यात प्रीतेश जखमी झाला. यानंतर आरोपींनी तोडफोड केली. पलाशच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काल दुपारी पाच आरोपींना अटक केली आणि पीसीआर घेतला.         (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख