त्याला गोळ्या घालून उपराजधानीत उडवायची होती खळबळ, पण... - he wanted to shoot and blow up the nagpur but | Politics Marathi News - Sarkarnama

त्याला गोळ्या घालून उपराजधानीत उडवायची होती खळबळ, पण...

अनिल कांबळे 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

आटे पाच वाजता मॉर्निंग वॉकला जातात. सोमवारी असलम आणि अभिषेक त्यांच्या घराजवळ आले. अभिषेक आटे यांचा मागोमाग फिरून पाळत ठेवत होता तर असलम त्यांच्या घरात घुसला. २० मिनिटांच्या शोधानंतर त्याला कपाटात पिस्तूल आणि काडतूस सापडले. लगेच त्याने अभिषेकला मिसकॉल करीत मोहिम फत्ते झाल्याचा इशारा केला. 

नागपूर : शहरातील एका कुख्यात गुंडाला प्रतिस्पर्धी टोळीच्या म्होरक्याला गोळ्या घालून शहरात खळबळ उडवायची होती. यासाठी पहिले गरजेचे होते एक पिस्तूल. यासाठी त्याने पिस्तूल चोरुन आणण्यासाठी चोरांना सुपारी दिली. चोरटे पिस्तुल चोरण्यासाठी गेले, पिस्तूल चोरले पण त्यानंतर ते घाबरल्यामुळे सर्व गेम फसला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने हा गेम आखण्यात आला होता. पण तो पूर्णपणे फसला. 

कुख्यात गुंड दुर्गेश पसेरकर याला अन्य टोळीच्या म्होरक्या सनीचा गोळ्या घालून 'गेम’ करायचा होता. एकेकाळी सनीने त्याच्यावर गोळी चालवली होती. गोळ्या झाडून खून केल्याने आपण शहराचा डॉन होऊ असेही त्याचे स्वप्न होते. याकरिता त्याला पिस्तूल हवी होती. सुभाषनगर टी-पॉईंटजवळ राहणाऱ्या दुर्गेशला घराजवळच राहणारे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झालेले उपायुक्त ध्रुव पिसाराम आटे (७१) यांच्याकडे परवाना असलेली पिस्तूल आणि काडतूस असल्याचे ठाऊक होते. आधी ते चोरण्याचा त्याने प्लॅन आखला. सराईत चोरट्याशी संपर्क साधला. असलम अजहर काजी (१८, रा. पाटनकर चौक) आणि अभिषेक अशोक कोटांगळे (२१,नागार्जून कॉलनी) या दोघांना पिस्तूल चोरीची सुपारी दिली. त्यांना आटे यांचा दिनक्रम समजावून सांगितला तसेच पिस्तूल कुठे ठेवली आहे, याचीही सविस्तर माहिती दिली. 

१२ हजारात दिली सुपारी 
असलम काजी हा मूळचा काटोलचा असून दुर्गेशच्या तिसऱ्या बायकोच्या मुलाचा मित्र आहे. त्याच्यासोबत तो दुर्गेशला भेटायला आला होता. त्याला दुर्गेशने पिस्तूल चोरीची १२ हजार रुपयांत सुपारी दिली. त्याने अभिषेक कोटांगळे याला गाठले. अभिषेक हा किरायाने आटो चालवायचा पण लॉकडाऊनमुळे तो बेरोजगार होता. त्याला असलमने आपल्या चोरीच्या कटात सहभागी केले. 

अशी केली चोरी 
आटे पाच वाजता मॉर्निंग वॉकला जातात. सोमवारी असलम आणि अभिषेक त्यांच्या घराजवळ आले. अभिषेक आटे यांचा मागोमाग फिरून पाळत ठेवत होता तर असलम त्यांच्या घरात घुसला. २० मिनिटांच्या शोधानंतर त्याला कपाटात पिस्तूल आणि काडतूस सापडले. लगेच त्याने अभिषेकला मिसकॉल करीत मोहिम फत्ते झाल्याचा इशारा केला. 

असा लागला सुगावा 
पिस्तूल चोरीला गेल्याची तक्रार आल्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी फुलारी, उपायुक्त राजमाने यांनी युनिट एकचे प्रमुख संतोष खांडेकर यांच्यावर चोरीचा छडा लावण्याची जबाबदारी सोपवली. त्यांनी शेजारी राहणाऱ्या दुर्गेशवर पाळत ठेवली. सीसीटीव्ही फुटेज तपासले. धागा मिळताच दुर्गेशच्या संपर्कातील पहिला व्यक्ती असलमला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अभिषेकची माहिती दिली. त्यानंतर दुर्गेशच्या डाव उधळून लावत तिघांनाही अटक केली.         (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख