प्रेयसीला फिरायला नेले आणि तिकडेच अडीच लाखांत विकले.. - he took his girlfriend for a tour and sold her there for two and a half lakhs | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

प्रेयसीला फिरायला नेले आणि तिकडेच अडीच लाखांत विकले..

अनिल कांबळे
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

६ ऑक्टोबरला तिला पतीचा मोबाईल हाती लागला. तिने घरी कुणी नसल्याची संधी साधून नागपुरात राहणाऱ्या आईला फोन केला. ‘मला अडीच लाखांत विकले असून मी येथे अडकली आहे. मला बाहेर काढ.  मी खूप संकटात आहे.’ असे आईला सांगितले. तिच्या आईने मुलीवरील संकट बघता इमामवाडा पोलिस स्टेशन गाठले.

नागपूर : पतीपासून विभक्त झालेल्या तरुणीला एकाने फसवले. प्रेमजालात फसवून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यास बाध्य केले. त्यानंतर फिरायला जायचे आहे, असे सांगून तिला राजस्थानमध्ये नेले आणि तेथे तिचा सौदा करून अडीच लाख रुपयांत विकले. सहा महिन्यांनतर तरुणीने संधी साधून नागपुरात राहणाऱ्या आईला कॉल केला. त्यानंतर तिच्या प्रियकराचे पाप जगासमोर आले. इमामवाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित २८ वर्षाची तरूणी रिया (बदललेले नाव) ही आईसह इमामवाडा परिसरात राहते. ती कॅटरर्सच्या कामाला जात होती. तिचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र तिचा पती दारूडा निघाला आणि कामही करीत नव्हता. त्यामुळे ती वर्षभरातच माहेरी परतली. तिची ओळख अशोक चौकात राहणाऱ्या आरोपी राहुल मेश्राम याच्याशी झाली. त्यांची मैत्री झाली. 

रिया एकटीच राहत असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने तिच्याशी जवळिक वाढवली. तो तिला इव्हेंट मॅनेजमेंटच्या कामाला न्यायला लागला. कामावरून यायला उशिर होत असल्यामुळे दोघेही अनेकदा बाहेरगावी मुक्कामी राहत होते. राहुलने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. दोघांचे संबंध वाढत गेले. तिला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याची आयडीया राहुलने दिली. ती राहायला लगेच तयार झाली. दोघांनी गंगाबाई घाट परिसरात रूम केली. दोघेही पती-पत्नी प्रमाणे राहू लागले. दोघेही सोबतच कामाला जात होते आणि एकत्र राहात होते.  

प्रियकराने रचला विक्रीचा कट
राहुलने रियाला राजस्थान फिरायला जाण्याचा बेत असल्याचे सांगितले. त्याने आपला साथीदार जमनालाल याला रियाला विकण्याच्या प्लानमध्ये सहभागी करून घेतले. दोन महिन्यांपूर्वी तिघेही राजस्थानला गेले. तेथे रियाला एका वृध्द व्यक्तीच्या घरी नेले. तिचे बळजबरी त्या वृध्दासोबत लग्न लावून दिले. त्या वृध्दाकडून अडीच लाखांची रक्कम घेतली आणि पळून आले.

जीन्स आणि टीशर्ट घालणाऱ्या रियाला राजस्थानमध्ये चोवीस तास घुंघटमध्ये राहावे लागत होते. तिला मारहाणीसारख्या अत्याचाराचाही सामना करावा लागत होता. तसेच तिला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नव्हते. तिला घरी बोलू देत नव्हते. त्यामुळे तिचा कोंडमारा होत होता. तेथे ती शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळली होती.

अशी आली घटना उघडकीस
६ ऑक्टोबरला तिला पतीचा मोबाईल हाती लागला. तिने घरी कुणी नसल्याची संधी साधून नागपुरात राहणाऱ्या आईला फोन केला. ‘मला अडीच लाखांत विकले असून मी येथे अडकली आहे. मला बाहेर काढ.  मी खूप संकटात आहे.’ असे आईला सांगितले. तिच्या आईने मुलीवरील संकट बघता इमामवाडा पोलिस स्टेशन गाठले. पीआय मुकुंदा साळूंखे यांनी हकिकत जाणून घेत त्वरित गुन्हा दाखल केला तसेच तरूणीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.

(Edited By : Atul Mehere) 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख