आपले आमदार सांभाळायची त्यांची कुवत नाही : डॉ. नितीन राऊत - he is not strong enough to handle his mlas said dr nitin raut | Politics Marathi News - Sarkarnama

आपले आमदार सांभाळायची त्यांची कुवत नाही : डॉ. नितीन राऊत

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकार जीएसटीचा निधी देत नाही. दुष्काळग्रस्त भागात पथक पाठवत नाही, यावर विरोधी पक्ष बोलत नाही. सरकार पाडण्याची भाषा ते करतात, मात्र त्यांचे आमदार दुसऱ्या पक्षात चालले असल्याने त्यांची चलबिचल होते आहे.

नागपूर : वीजबिलात सवलत देण्यासाठी विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी मोर्चे काढत आहेत, आंदोलने करीत आहेत. सर्व शक्ती त्यांनी महाराष्ट्रातच पणाला लावली आहे. यातील काही ताकद त्यांना आपले आमदार सांभाळण्यात लावावी. जेणेकरून ते दुसऱ्या पक्षांत जाणार नाही. खरे तर आपलेच आमदार सांभाळायची यांची कुवत नाही, असे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आज म्हणाले. 

डॉ. राऊत म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कमी होऊनही केंद्र सरकार पेट्रोल, डिझेलचे दर कमी करत नाही. संविधान दिनानिमित्त नागपूरच्या संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राऊत आले होते. यावेळी त्यांनी देशात दलितांवर अन्याय होत आहे, त्यांना देशात दुय्यम स्थान दिलं जातंय, त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप दिली जात नाही. मात्र त्यांच्याबाबत कुणी बोलत नाही, दलितांबाबत केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

वीजबिलात माफी देण्याची मागणी विरोधी पक्ष करते आहे. मात्र, कोरोना काळात आम्ही लोकांना मदत केली, शेतकऱ्यांना मोठी मदत केली. कोरोनाशी लढता लढता राज्याची तिजोरी रिकामी झाली. सर्व सोंग करता येतात, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. भाजप सरकारच्या काळात राज्याची तिजोरी रिकामी झाली आणि राज्य कर्जात बुडाले, असाही आरोप त्यांनी केला. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा आम्ही यातून मार्ग काढू, असंही राऊत यांनी सांगितलं. 

केंद्र सरकार जीएसटीचा निधी देत नाही. दुष्काळग्रस्त भागात पथक पाठवत नाही, यावर विरोधी पक्ष बोलत नाही. सरकार पाडण्याची भाषा ते करतात, मात्र त्यांचे आमदार दुसऱ्या पक्षात चालले असल्याने त्यांची चलबिचल होते आहे. आपले आमदार संभाळायची कुवत त्यांच्यात नाही, अशी टीका करत भाजप विरोधी पक्षाचं काम चांगलं करत आहे. ते त्यांनी करावं, म्हणजे राज्य अधिक चांगल्या पद्धतीने पुढं जाईल, असे डॉ. राऊत म्हणाले.
(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख