"त्याने' आठ तरूणींना सोडले रस्त्यावर, मग त्यांनी पोलीसांना सांगितली थरारक आपबिती 

मुलींनी गुुजरातमधील एका कारचालकास महाराष्ट्रात पोहचवून देण्याची विनंती केली. त्या कारचालकाने 28 हजार रूपये भांडे सांगितले. मुलींकडे दुसरे कोणताही पर्यान नसल्यामुळे त्यांनी होकार दिला आणि सोमवारी भर दुपारी त्या तरूणींना कारचालकाने बसस्टॅंडवर सोडून दिले.
Gujrat Girls
Gujrat Girls

नागपूर : सीताबर्डीतील रस्त्यावर आठ तरूणी खांद्यावर भल्या मोठ्या बॅगा अडकवून या चौकातून त्या चौकात फिरत होत्या. पुन्हा व्हेरायटी चौकात येऊन उभ्या राहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यांवर त्या उच्चशिक्षित वाटत होत्या. अनेकांनी काहीतरी विचारपूस करीत होत्या. जवळपास कडक उन्हात दोन तास फिरल्यानंतर एका व्यक्‍तीने गुन्हे शाखेचे अतिरीक्त पोलीस आयुक्त डॉ. निलेश भरणे यांना माहिती दिली. पंधरा मिनिटात डॉ. भरणे यांचा ताफा व्हेरायटी चौकात आला. त्यांनी आठही मुलींना बोलावले. सर्वप्रथम त्यांना थंड पाणी दिले आणि त्यानंतर जेवणाबाबत विचारपूस केली. त्यानंतर त्या मुलींनी अंगावर काटा उभा राहणारी आपबिती ऐकविली. डॉ. भरणे यांनी लगेच त्यांची समस्यांचे समाधान केले आणि त्यांना आपापल्या गावी रवाना केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील उच्चशिक्षित आठ मुली गुजारत राज्यातील अहमदाबाद शहरातील एका कंपनीत नोकरीवर आहेत. त्यामध्ये दोन तरूणी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमधील तर 3 तरूणी वर्धा जिल्ह्यातील नागभीड शहरातील असून दोन भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील तर एक युवती गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्‍यातील पुजारी टोला गावातील आहे. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली. त्या कंपनीच्या मालकाने महिन्याचे वेतन देऊन महाराष्ट्रात परत जाण्यास सांगितले. त्यामुळे मुलींनी गुुजरातमधील एका कारचालकास महाराष्ट्रात पोहचवून देण्याची विनंती केली. त्या कारचालकाने 28 हजार रूपये भांडे सांगितले. मुलींकडे दुसरे कोणताही पर्यान नसल्यामुळे त्यांनी होकार दिला आणि सोमवारी भर दुपारी त्या तरूणींना कारचालकाने बसस्टॅंडवर सोडून दिले. त्यानंतर पुढे जाण्यास नकार दिला आणि तो लगेच पळून गेला. अडचणीत सापडलेल्या तरूणींनी गणेशपेठ बसस्थानक गाठले. मात्र, तेथे बससेवा बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पायी चालत व्हेरायटी चौक गाठले. जवळपास दोन तास दुपारच्या कडक उन्हात त्या तरूणी इकडून-तिकडे फिरत होत्या. 

उपाशी होत्या तरूणी 
सलग दोन दिवस प्रवास असल्यामुळे त्या तरूणी उपाशीपोटी नागपुरात पोहचल्या. त्यांच्याकडे मोजकेच पैसे असल्यामुळे त्यांनी नाश्‍ता करणे टाळले. अडचणीत असलेल्या तरूणींची व्यथा विमल नामक व्यक्‍तीला कळली. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त डॉ. भरणे यांना फोनवरून माहिती दिली. डॉ. भरणे ताफ्यासह पोहचताच तरूणी घाबरल्या. आपल्यावर पोलिस कारवाई करतील अशी भीती त्यांना होती. 

जेवणाची केली व्यवस्था 
डॉ. भरणे यांनी तरूणींना सर्वप्रथम जेवणाबाबत विचारणा केली. त्यामुळे तरूणींना कारवाईऐवजी पोलिस मदत करीत असल्यामुळे आर्श्‍चय वाटले. सर्वप्रथम त्यांना जेवण आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर त्यांची अडचण समजून घेण्यात आली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ई-पास नव्हती. तसेच मेडिकल सर्टिफिकेटही नव्हते. 

"घाबरू नका... आम्ही आहोत' 
आता आम्ही घरी कसे जाऊ ? असा प्रश्‍न तरूणींनी पोलिसांना केला. तेव्हा भरणे यांनी लगेच दोन महिला पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत देऊन मुलींची वैद्यकीय चाचणी करण्याची सोय केली. त्यांनतर कागदपत्रे जमा करून त्यांची प्रवासाची ई-पास तयार करण्यात आली. सर्व कायदेशिर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मुलींना आपापल्या जिल्ह्यातून गावी पाठविण्यासाठी दोन कारची व्यवस्था केली. 

तरूणींच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना सुरक्षितपणे घरापर्यंत सोडवून देणे हे आमचे कर्तव्य होते. पोलिसांचे कर्तव्य म्हणून समस्या सोडविण्यासाठी नागपूर पोलिस कटिबद्ध आहेत. आठही तरूणीं सुखरूप घरी पोहचल्याची खात्री केल्यानंतर वेगळेच समाधान वाटले. 
डॉ. निलेश भरणे, अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, गुन्हे शाखा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com