ही तर भाजपची द्वेषाने पछाडलेली मानसिकता : अतुल लोंढे - this is the hateful mentality of bjp said atul londhe | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

ही तर भाजपची द्वेषाने पछाडलेली मानसिकता : अतुल लोंढे

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

गुन्हेगाराला वाचविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर तो सुद्धा गुन्हेगारच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याचे जे गळे काढून ओरडत आहेत, त्याला काही अर्थ नाही. कारण गुन्हा करायचा आणि अशी ओरड करायची. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे गुन्हा करण्याची परवानगी द्यावी, असे भाजपचे म्हणणे आहे का?

नागपूर : सध्या अख्खा भारतीय जनता पक्ष राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मागे लागलेला आहे. यशोमती ठाकूर यांना एका जुन्या प्रकरणात अमरावती जिल्हा न्यायालय शिक्षा काय सुनावली आणि हे कामी लागले. चिक्की घोटाळ्यापासून ते उंदरांनी खाल्लेल्या मंत्रालयातील फाईल्सपर्यंतच्या सर्व प्रकरणांना क्लिन चिट देणारे आणि एका तडीपाराला आपला अध्यक्ष करणाऱ्यांना यशोमती ठाकूर यांचा राजीनामा मागण्याचा काय अधिकार, अशा प्रश्‍न महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे यांनी केला आहे. 

श्री लोंढे म्हणाले, यशोमती ठाकूर या सामान्य लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या आहेत. त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार या लोकांना नाही. त्यांनी चूक केली असेल तर ते न्यायालय ठरवेल ना. महिलांचे विषय चळवळीतील कार्यकर्ता बनून सोडविणाऱ्या महिलेल्या मागे प्रदेशाध्यक्षांसह अख्खा भाजप लागला आहे. त्यांची ही मानसिकता द्वेषाने पछाडलेली आहे. याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे मुंबईचे फुफ्फूस असलेले आरे जंगल वाचविल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन करण्याऐवजी कांजुरमार्ग जमिनीचे प्रकरण काढून मेट्रोच्या कामाला अडथळा कसा निर्माण करता येईल, हा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. 

महाराष्ट्रासाठी भाजपची भूमिका विकासविरोधी आहे. महाराष्ट्रात चांगलं काम झालच नाही पाहिजे, असे यांचे प्रयत्न आहेच. नशीबाने अन्याय केलेली एक महिला आपल्या मुलांचा सांभाळ करुन जनसेवा करते आहे, राज्यात चांगलं काम करते आहे. तिला प्रोत्साहन देण्याऐवजी, निरुत्साही कसे करता येईल, असे प्रयत्न भाजप करत आहे. काल अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे जाऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जे केले, ते त्यांची महिलाविरोधी मानसिकता दर्शविते. महिलांना दुय्यम दर्जा देणारी मानसिकता भाजपवाल्यांची असल्याचा आरोप श्री लोंढे यांनी केला.  

येवढी मग्रुरी येते कुठून ?
कायद्याच्या पुढे कुणीही नाही. अर्णब गोस्वामीने गुन्हा केला आहे. त्याच्यामुळे दोन निष्पाप जीव गेले आहेत. त्याच्या पाठीशी पत्रकार उभे राहात नाही. पण भाजपचे कार्यकर्ते उभे राहतात. याचा अर्थ गोस्वामींची संपूर्ण पत्रकारिता इतर राजकीय पक्षांना बदनाम करून भाजपच्या पाठीशी कसे उभे राहता येईल, यासाठी खर्ची घातली आहे. भाजपच्या नेत्यांना न्यायालयावर विश्‍वास नाही का? कोर्टामध्येसुद्धा लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो आणि न्यायालयाला समन्स द्यावा लागतो.

अशा प्रवृत्ती लोकशाहीला घातक असतात. त्यामुळे गुन्हेगाराला वाचविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर तो सुद्धा गुन्हेगारच आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याचे जे गळे काढून ओरडत आहेत, त्याला काही अर्थ नाही. कारण गुन्हा करायचा आणि अशी ओरड करायची. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे गुन्हा करण्याची परवानगी द्यावी, असे भाजपचे म्हणणे आहे का आणि अर्णबकडे येवढी मग्रुरी आली कुठून, असा प्रश्‍न अतुल लोंढे यांनी केला.              (Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख