‘राम’च्या आधी ‘ह’ पाहिजे : विजय वडेट्टीवार  - h should be before ram said vijay wadettiwar | Politics Marathi News - Sarkarnama

‘राम’च्या आधी ‘ह’ पाहिजे : विजय वडेट्टीवार 

निलेश डोये
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

नुकसानीच्या पाहणीकरता केंद्राकडून पथक आल्यावर मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येतो, असे स्पष्ट करीत अर्ध्या अकलेवर भाजप नेते तारे तोडतात, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. केंद्राकडून मदतीसंदर्भात राज्याला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागपूर : पालघर येथील साधूंच्या हत्‍येची चौकशी सीबीआय मार्फत करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. भाजप नेते राम कदम यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर सुशांतसिंग राजपूत प्रकरणात भाजप तोंडघशी पडली आणि आज ज्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नावात ‘राम’च्या आधी ‘ह’ पाहिजे, असा अशी कडवट टिका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते.  

नुकसानीच्या पाहणीकरता केंद्राकडून पथक आल्यावर मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येतो, असे स्पष्ट करीत अर्ध्या अकलेवर भाजप नेते तारे तोडतात, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. केंद्राकडून मदतीसंदर्भात राज्याला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. श्री वडेट्टीवार म्हणाले की, शेतकरी मदतीसंदर्भात विरोधकांकडून संभ्रम पसरविण्यात येत आहे. ही मदत अवकाळी पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी आहे. प्रशासनाकडून पंचनाम्याच्या आधारे आलेल्या अहवालावर मदत देण्यात आली. विदर्भाला १७ कोटीच रुपये मिळाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. विदर्भाला २८७ कोटी दिले. पाच वर्षांत त्यांनी शेतकरी विरोधी कार्य केले. केंद्राकडून अद्याप एक रुपयाचीही मदत मिळाली नाही. नुकसानीच्या पाहणीसाठी पथकही पाठविले नाही. केंद्राला याबाबत तीनदा विनंती करण्यात आली. परंतु त्यांनी साधी दखल घेतली नाही. केंद्राकडून पाहणी झाल्यानंतर मदतीचा प्रस्ताव पाठविल्या जातो. भाजप नेते अर्ध्या अकलेवर तारे तोडतात, असे ते म्हणाले. 

केंद्राकडून पथक न आल्यास सरकार मदतीचा प्रस्ताव स्वतः पाठवेल. केंद्राकडे ३८ हजार कोटींचा जीएसटीचा निधी थकला आहे. राज्याच्या तिजोरीवर ताण आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता १० हजार कोटींची मदत दिली. निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर २३०० कोटींचा पहिला हप्ता दिला. २७०० कोटींचा दुसरा हप्ता १५ दिवसात देण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्‍प्यात उर्विरित निधी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एनडीआरएफच्या निकषांनुसार राज्याला मदत मिळाली पाहिजे. केंद्राने पश्चिम बंगाल व कर्नाटला मदत दिली. राज्याने चक्रि‍वादळाने झालेल्या नुकसानाचा एक हजार कोटींचा प्रस्ताव पाठविला असताना २६८ कोटीच दिले. केंद्र सरकारकडून राज्याला सापत्न वागणूक मिळत आहे. राज्यातील वजनदार नेत्यांनी केंद्रात वजन वापरून मदत मिळवून दिली पाहिजे, असेही ते म्हणाले. धानाला ७०० रुपये बोनस देण्यात आल्याचे ते म्हणाले. 

सोयाबीनसाठी वेगळा विचार 
सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. सोयाबीन पिकांना मदत देण्यासाठी वेगळा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

केंद्राकडून शेतकऱ्यांचा अपमान 
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येतात. पण ‘आयटी रिटर्न’ भरणाऱ्यां शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल करण्यात येत आहे. जेव्हा की ते फक्त रिटर्न फाईल करतात, पण ‘टॅक्स पेयी’ नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी मुलाच्या शिक्षणाकरता साधा फार्म भरला त्याच्याकडूनही ही रक्कम वसूल करण्यात येत आहे. हा शेतकऱ्यांचा अपमान असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख