दारव्हा-दिग्रस-नेरमध्ये पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकदा निर्विवाद... - guardian minister sanjay rathod is once again undisputed in darwha digras and ner | Politics Marathi News - Sarkarnama

दारव्हा-दिग्रस-नेरमध्ये पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकदा निर्विवाद...

चेतन देशमुख
सोमवार, 18 जानेवारी 2021

यवतमाळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारला असली तरी जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीने आगेकूच केली आहे.

यवतमाळ : राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा मतदारसंघ असलेल्या दारव्हा, दिग्रस व नेर तालुक्यात संजय राठोड यांनी पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या यवतमाळ जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसल्याचे मानले जात होते. पण ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांनी येथे फक्त संजय राठोडच हे सिद्ध केले आहे. 

स्थानिक नेत्यांनी कायम ठेवली सत्ता 
जिल्ह्यातील 925 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. सर्वच नेते आपापल्या गावांतील ग्रामपंचायत आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. यवतमाळ तालुक्यात भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात त्यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी आपली सत्ता कायम ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात असलेल्या जवळपास सर्वच नेत्यांनी आपापल्या गावांत विजय मिळविला आहे. 

जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड यांनीही आपला गड कायम राखत. फुबगाव ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती निमिष मानकर यांच्या सर्कलमधील पांढरकवडा रूंझा ग्रामपंचायतीवर त्यांनी पुन्हा आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. यवतमाळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारला असली तरी जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये महाविकास आघाडीने आगेकूच केली आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी वापरण्यात आलेले फॉर्म्यूला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्येही यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. 
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख