पालकमंत्री म्हणाले, आठवड्यातून चार दिवस होणार लसीकरण… - the guardian minister said vaccination will be done four times in a week | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

पालकमंत्री म्हणाले, आठवड्यातून चार दिवस होणार लसीकरण…

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 16 जानेवारी 2021

कोविड लसीकरणाच्या नागपुरात यापूर्वी दोन ‘ड्राय रन’ झाल्या. त्याच धर्तीवर केंद्र शासनाच्या दिशानिर्देशांनुसार पाचपावली केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती.

नागपूर : महानगरपालिकेच्या पाचपावली स्त्री रुग्णालय केंद्रावर कोविड लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आज राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. उद्‌घाटनानंतर बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, संपूर्ण राज्यात आज लसीकरणाचा शुभारंभ झाला. नागपूर शहरात पाच केंद्रावर लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर आठवड्यातून चार दिवस लसीकरण होणार आहे. प्रत्येक दिवशी प्रति केंद्र १०० व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. संपूर्ण यंत्रणा सज्ज असून लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा राहणार आहे. २८ दिवसानंतर दुसरा डोज देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा रुग्णालय, एम्स या ठिकाणीही एकाच वेळी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी विभागीय आयुक्त संजीवकुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. दिलीप झळके, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मनपाच्या वैद्यकीय समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यावेळी उपस्थित होते. 

कोविड लसीकरणाच्या नागपुरात यापूर्वी दोन ‘ड्राय रन’ झाल्या. त्याच धर्तीवर केंद्र शासनाच्या दिशानिर्देशांनुसार पाचपावली केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वप्रथम आरोग्य विभागातर्फे संदेश प्राप्त झालेल्या व्यक्तींची नोंदणी, त्यांचे शरीर तापमान तपासल्यानंतर आणि हात सॅनिटाईज केल्यानंतर त्यांना बसण्यासाठी प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था, त्यानंतर लसीकरण खोलीत आधार कार्डच्या आधारे व्यक्तींची ओळख पटविण्याची व्यवस्था, त्याची चाचपणी झाल्यानंतर लसीकरण, लसीकरणानंतर अर्धा तास देखरेखीखाली ठेवण्यासाठी असलेली व्यवस्था आदी चोखपणे करण्यात आले होते. पालकमंत्री नितीन राऊत यांनी फीत कापून लसीकरण मोहिमेची सुरुवात केली. 

त्यांनी केंद्रावरील व्यवस्थेची पाहणी केली. कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी आणि लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींशी संवाद साधला. यावेळी आशीनगर झोनच्या सभापती विरंका भिवगडे, नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, दिनेश यादव, भावना लोणारे, घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार, आशीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, अतिरिक्त सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, टाटा ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. टिकेश बिसेन, मातृत्व आणि बालकल्याण वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मोहकर, पाचपावली स्त्री रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बाळकोटे-खंडाईत, आरोग्य विभागाच्या समन्वयक दीपाली नागरे, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले आदी यावेळी उपस्थित होते. 

आजचा दिवस आनंदाचा : महापौर तिवारी
वर्षभरापासून कोविडच्या संक्रमणाने शहर त्रस्त झाले होते. या काळात आरोग्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी प्रयत्न केले. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भारतात लस उपलब्ध झाली असून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज होतोय, याचा आम्हाला अभिमान आहे. आजचा दिवस आनंदाचा असून या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो, असे महापौर दयाशंकर तिवारी यांनी म्हटले. 

पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ वर्कर’ला लस : आयुक्त राधाकृष्णन बी.
कोविड लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोविडकाळात सातत्याने समोर राहून वैद्यकीय सेवा देणाऱ्या ‘हेल्थ वर्कर’ला लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नागपूर शहरात साडे बावीस हजार आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या या सर्व हेल्थ वर्कर्सना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख