पदवीधरची निवडणूक भाजपच्या अस्मितेची : नितीन गडकरी

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संदीप जोशी म्हणाले, मागील ५८ वर्षांपासून हा मतदारसंघ आपला आहे. भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातील मतदारांशी कायम संपर्क ठेवला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. यापुढेही कायम हा भाजपकडे राहण्यासाठी मतदारांपर्यंत प्रत्येकाने पोहोचून या निवडणुकीतील विजय निश्‍चित करावा
Nitin Gadkari with Joshi and Bawankule
Nitin Gadkari with Joshi and Bawankule

नागपूर : वैचारिक मतभेद असतानाही केवळ भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन नागपूर पदवीधर मतदारसंघात उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता केवळ संदीप जोशी यांची नाही तर भारतीय जनता पक्षाच्या अस्मितेची आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागून हा विजय सुकर करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या विजयासाठी त्यांनी पूर्व विदर्भातील खासदार, आमदार यांच्यासह सुमारे चार हजार पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत ऑनलाइन संवाद साधला. यावेळी निवडणूक प्रमुख माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार महापौर संदीप जोशी उपस्थित होते. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ना. नितीन गडकरी म्हणाले, नागपूरचे संदीप जोशी हे हाडाचे कार्यकर्ता आहेत. त्यांच्यात उत्तम संघटन कौशल्य आहे. 

खासदार क्रीडा महोत्सवाचे समन्वयक असो, स्थायी समिती सभापती असो की महापौर असो, त्यांनी प्रत्येक जबाबदारी चपखलपणे सांभाळली. त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती मोठी आहे. त्यांच्यासारखा उमेदवार निवडून येणे, ही या मतदारसंघाची गरज आहे. संदीप जोशी यांना निवडून येण्यासाठी ही निवडणूक प्रत्येकाने प्रतिष्ठेची बनवावी. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. स्व. गंगाधरराव फडणवीस, मोतीरामजी लहाने, दि.ग. देशपांडे, रामजीवन चौधरी अशा अनेक दिग्गजांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 

मला सुद्धा या मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली. या मतदारसंघावर भाजपच्या विचारांचा पगडा आहे. आताचे उमेदवार संदीप जोशी यांचे कार्य उत्तम आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने या मतदारसंघातील पदवीधरांचा आवाज ते विधानमंडळात बुलंद करतील, असा मला विश्वास आहे. परंतु यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने कामाला लागायला हवी. सुमारे १०० ते १५० मतदारांशी प्रत्यक्ष आणि सुमारे २५० मतदारांशी फोनद्वारे संवाद प्रत्येकाने साधावा. पहिल्या पसंतीचे मत देताना गफलत होऊ नये यासाठी मतदान कसे करायचे, याची माहिती द्यावी. ‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ संपर्क होणे आवश्यक आहे. ही जबाबदारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी निवडणूक प्रमुख आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर जो अन्याय केला, त्या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला मतदान करून सरकारविरुद्ध आवाज उठवायचा आहे. पुढील पाच दिवस कठोर मेहनत करून भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संदीप जोशी म्हणाले, मागील ५८ वर्षांपासून हा मतदारसंघ आपला आहे. भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघातील मतदारांशी कायम संपर्क ठेवला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. यापुढेही कायम हा भाजपकडे राहण्यासाठी मतदारांपर्यंत प्रत्येकाने पोहोचून या निवडणुकीतील विजय निश्‍चित करावा, अशी विनंती त्यांनी केली.

२९ नोव्हेंबरला पदवीधरांचा मेळावा
नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजप-मित्र पक्षाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार दत्ता मेघे, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात पदवीधरांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com