शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा सरकारचा प्रयत्न : आमदार राणा  - governments attempt to suppress farmers agitation mla rana | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा सरकारचा प्रयत्न : आमदार राणा 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

मुंबईला आंदोलनासाठी जाण्यासाठी निघालेले आमदार व खासदार राणा यांना पोलिसांनी रोखल्यामुळे युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विदर्भ एक्सप्रेस अर्धा तास बडनेरा स्थानकावर रोखल्याची चर्चा आहे.

अमरावती : मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी रेल्वेने मुंबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना आज रात्री पोलिसांनी स्थानबद्ध केले. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, तसेच लॉकडाउनच्या काळातील ५० टक्के वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. 
 
गुरूकुंज मोझरी येथे आंदोलन केल्याने आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत जामीन घेण्यास नकार दिल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. आमदार रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आज त्यांची सुटका झाली. मुंबई येथे मातोश्रीवर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना पोलिसांनी त्यांच्या घरासमोर रोखले व दोघांना पोलिस आयुक्तालयात स्थानबद्ध करण्यात आले. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे काय, असा सवाल त्यांनी केला. ज्यांनी ही कारवाई केली त्यांच्या विरोधात संसदेत प्रश्न लावून त्यांच्या निलंबनाची मागणी रेटली जाईल, असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. बडनेरा रेल्वेस्टेशनवरून आज सायंकाळी राणा यांच्यासह काही शेतकरी आणि कार्यकर्ते विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. 

विदर्भ एक्सप्रेस रोखल्याची चर्चा 
मुंबईला आंदोलनासाठी जाण्यासाठी निघालेले आमदार व खासदार राणा यांना पोलिसांनी रोखल्यामुळे युवा स्वाभिमानचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विदर्भ एक्सप्रेस अर्धा तास बडनेरा स्थानकावर रोखल्याची चर्चा आहे.

(Edited By : Atul Mehere)

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख