सरकार नितीन राऊतांना बदनाम करतेय, आता त्यांनी राहू नये… - the government is defaming nitin raut now he should not stay | Politics Marathi News - Sarkarnama

सरकार नितीन राऊतांना बदनाम करतेय, आता त्यांनी राहू नये…

अतुल मेहेरे
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

९५ लाख लोकांची वीज कापल्यावर त्याचा परिणाम थेट पाच कोटी जनतेवर होणार आहे. येवढे मोठे पाप हे सरकार कोठे फेडणार आहे? असा प्रश्‍न करून आपल्याच सरकारमध्ये ऊर्जामंत्री हतबल झाल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले. 

नागपूर : महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना घोषणा करायला सांगतात आणि ऐन वेळेवर ‘हात वर’ करतात. त्यामुळे राज्यातील जनतेसमोर ऊर्जामंत्री तोंडघशी पडत आहेत. महाराष्ट्र सरकार चळवळीतून वर आलेल्या डॉ. नितीन राऊत यांना बदनाम करीत असल्याचा घणाघाती आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. 

प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनात आणले तर ऊर्जा खात्याचे सर्व प्रश्‍न एका मिनिटात, चुटकीसरशी सुटू शकतात. पण त्यांना तसे करायचे नाहीये. त्यांना कॉंग्रेसच्या मंत्र्यांना बदनाम करायचे आहे. म्हणूनच हा खेळ त्यांनी चालविला आहे. पण या खेळात राज्यातील जनतेचे हाल होत आहेत, हे त्यांना विसरू नये. डॉ. नितीन राऊत चळवळीतून वर आलेले नेतृत्व आहे. त्यांना माझा सल्ला आहे की, त्यांना आता अशा सरकारमध्ये राहू नये आणि बदनाम होऊ नये. सरकारच्या बोलण्यावर आता जनतेचा विश्‍वास राहिलेला नाही. जनतेचाच काय?  सरकारमधील मंत्र्यांचाही एकमेकांवर विश्‍वास नाही. त्यामुळे सरकार नीट चालत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांचे, पूरग्रस्तांचे सर्वांचेच हाल होत आहेत. 

याच सरकारने सुरुवातीला १०० युनिट वीज बिल माफ करण्याचा शब्द दिला होता, तो पाळला नाही. दिलेले एकही वचन या सरकारने पाळले नाही. उलट आता ९५ लाख लोकांची वीज कापायला निघाले आहेत. ९५ लाख लोकांची वीज कापल्यावर त्याचा परिणाम थेट पाच कोटी जनतेवर होणार आहे. येवढे मोठे पाप हे सरकार कोठे फेडणार आहे? असा प्रश्‍न करून आपल्याच सरकारमध्ये ऊर्जामंत्री हतबल झाल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख