हे सरकार ‘वाघांचे’ की लांडग्यांचे : प्रकाश आंबेडकर - this government belongs to tigers or wolves asked prakash ambedkar | Politics Marathi News - Sarkarnama

हे सरकार ‘वाघांचे’ की लांडग्यांचे : प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 31 मार्च 2021

फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वतः निर्णय घेत सर्व अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात खिरापत वाटपात कोण सहभागी होते व किती कोटींची खिरापत वाटप झाली, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा.

अकोला : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना १०० कोटी रुपये प्रतिमहिना जमा करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केला होता. हे प्रकरण सध्या राज्यभर तापत आहे. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा सहभाग असल्याचा संशय वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. हे सरकार वाघांचे म्हणजेच शिवसेनेचे की लांडग्यांचे, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. 

राज्यात वाघांचे (शिवसेनेचे) सरकार असताना मेळघाटातील वाघांची तस्करी कशी होते, हा प्रश्न पत्रकारांनी पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना विचारला असता त्यांनी ‘राज्य सरकार वाघांचे की लांडग्यांचे?’ असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. राज्यात सत्ताधीश राजकीय व प्रशासकीय गुन्हेगार एकत्र आल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे सांगून त्यांनी या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी प्रकरणात चौकशी आयोग स्थापन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्यालय यात सहभागी असल्याच्या संशयाला जागा निर्माण करून दिल्याचाही आरोपही केला.
 

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतःला दूर करण्यासाठी फोन टॅपिंगचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. राज्यात राजकीय, सत्ताधीश व प्रशासकीय गुन्हेगार एकत्र आले असून त्यांनी हात मिळवणी केल्याचा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी येथे केला आहे. शंभर कोटी रुपये वसुलीचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला होता. त्यातील वाटेकरी कोण, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा वसुलीचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला गेला की, सत्तारुढ तीन पक्षांचा हा निर्णय होता, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शंभर कोटींच्या प्रकरणातील सत्यता बाहेर आणावी अन्यथा यात भाजपचादेखील समावेश असू शकतो, असाही आरोपही त्यांनी केला. 

हेही वाचा : परमबीरसिंह यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात नाट्यपूर्ण घडामोडी : स्टेशन डायरी सादर करण्याचा आदेश

फोन टॅपिंग प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्वतः निर्णय घेत सर्व अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात खिरापत वाटपात कोण सहभागी होते व किती कोटींची खिरापत वाटप झाली, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा. या विषयी चौकशी आयोग स्थापन करून मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे नाव तर यात नाही ना असा संशय निर्माण केला आहे. मुख्यमंत्र्यांना या विषयी सर्व माहिती असून, त्यांनी ती माहिती त्यांनी सार्वजनिक करावी, अशी मागणी अ‍ॅड.आंबेडकर यांनी केली.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख