मुंबईच्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या, बाळासाहेब ठाकरेंचे नको...  

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची अडचण होत आहे. अडीच-अडीच वर्षाच्या फार्मुला घेत ठाकरेंनी भाजप सोबत यावे. हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे नाही.
Ramdas AthavaleRamdas Athavale
Ramdas AthavaleRamdas Athavale

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मारक आहे. समृद्धी महामार्गालाही बाळासाहेबांचेच नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येऊ नये, तर दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, दि. बा. पाटील मोठे नेते होते, असे आरपीआयचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. 

क्षत्रियांना १०-१२ टक्के आरक्षण देण्यासाठी संविधानात तरतूद करण्याची मागणीही त्यांनी येथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत केली. आठवले म्हणाले की, दि.बा. पाटील मोठे नेते होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मारक आहे. त्यामुळे त्यांच्या नावाऐवजी दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबईच्या विमानतळाला दिले पाहिजे. दलित आणि आदिवासींना गेल्या ७० वर्षांपासून नोकरीत पदोन्नतीमध्ये आरक्षण होते. ठाकरे सरकारने ते रद्द केले. फडणवीस सरकारच्या काळातही आरक्षण कायम असल्याचा दावा त्यांनी केली. 

मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे न ठेवू शकल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. याबद्दल त्यांनी राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. मराठा समाज हा सत्ताधीश आहे, उद्योगपती आहे. त्यामुळे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले. सर्वच जातीत लोक आर्थिक दुर्बल आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने ते आरक्षण द्यावे. ५० टक्क्यांच्या वरही आरक्षण नेण्याची तरतूद संविधानात करण्याची गरज आहे. मराठ्यांना जशी आरक्षणाची गरज आहे, तशीच जाट, राजपूत, ठाकूर आदी क्षत्रियांनासुद्धा आहे. त्यांनाही १० ते १२ टक्के आरक्षण द्यावे, अशी आमच्या पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्यांचे उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या सर्वांना या १० टक्क्यांमध्ये सामावून घेतले पाहिजे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात २० जूनच्या नंतर पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. त्यात सर्व आरक्षणाबाबत चर्चा करण्यात येईल. राज्य सरकारचा थकित जीएसटी निधी देण्याची मागणीही करू. केंद्राच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे सरकार नागरिकांकडून तो घेत आहे, असे म्हणत पेट्रोलवरील कर राज्याने कमी करावे, असे ते म्हणाले. दलितांवर अत्याचाराच्या घटना होत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी खर्डा येथील घटनेवर दिली. 

ठाकरेंना भाजप सोबत यावे 
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची अडचण होत आहे. अडीच-अडीच वर्षाच्या फार्मुला घेत ठाकरेंनी भाजप सोबत यावे. हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे नाही. भाजपही या लोकांच्या विरोधातच राहिली आहे. त्यामुळे भाजप सत्तेपासून दूर राहू शकत नाही, असे नाही. परंतु सत्ता मिळत असल्यास का घेऊ, असे ते म्हणाले. 

मनपाने बांधावे डॉ. आंबेडकर भवन 
अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पर्यटन विकास महामंडळाने तोडले. ते महानगरपालिकेने बांधावे, अशी मागणी त्यांनी केली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com