फुके म्हणाले, कॉंग्रेसने कट रचला तर भाजप दुतोंडी असल्याचा नाना पटोलेंचा पलटवार... - fuke said that if the congress hatched a conspiracy nana patole answered him | Politics Marathi News - Sarkarnama

फुके म्हणाले, कॉंग्रेसने कट रचला तर भाजप दुतोंडी असल्याचा नाना पटोलेंचा पलटवार...

अभिजित घोरमारे
बुधवार, 31 मार्च 2021

राज्य सरकार लवकरच ओबीसी जनगणना करण्याबाबत सर्क्यूलर काढणार असल्याचे पटोले म्हणाले. भाजप नेते ओबीसी जनगणनेच्या विरोधात आहेत. गेल्या बुधवारी सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात ओबीसी जनगणना जाहीर करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा केंद्र सरकारने ओबीसी जनगणना जाहीर करण्यास नकार दिला.

भंडारा : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपचे विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी गंभीर आरोप करताना कॉंग्रेसने कट रचून ओबीसी आरक्षण कमी केल्याचे म्हटले आहे. तर याला उत्तर देताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोलेंनी भाजपचे नेते दुतोंडी असल्याचा आरोप केला आहे. भाजप स्वतःच्या फायद्यासाठी ओबीसींचा वापर करत असल्याची तोफही नानांना डागली आहे. 

राज्य सरकार लवकरच ओबीसी जनगणना करण्याबाबत सर्क्यूलर काढणार असल्याचे पटोले म्हणाले. भाजप नेते ओबीसी जनगणनेच्या विरोधात आहेत. गेल्या बुधवारी सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात ओबीसी जनगणना जाहीर करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा केंद्र सरकारने ओबीसी जनगणना जाहीर करण्यास नकार दिला. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप थांबवल्या गेल्या. पण याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे भाजपचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असल्याचा घणाघातही पटोलेंनी केला. मी विधानसभा अध्यक्ष असतानाच ओबीसी जनगणनेचा ठराव आणला गेला आहे. राज्य सरकार लवकर ओबीसी जनगणना करण्यासाठी पावले उचलणार असल्याचेही पटोले म्हणाले. 

ओबीसींच्या प्रश्‍नावर हे लोक खोटे आरोप करू लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की, ओबीसीची जनगणना करून, ओबीसीचे आरक्षण निश्‍चित करून त्यापद्धतीने राजकीय आरक्षण करावे. फडणवीस सरकारने त्यांच्या काळात संविधानाला बगल देऊन दोन वर्ष नागपूर जिल्हा परिषदेला मुदतवाढ दिली. त्यानंतर अनेक जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांना आणि सदस्यांच्या लक्षात आले की हे होऊ शकतं. म्हणून मग त्यांनीही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. जेव्हा सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आले, त्यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे नोटीफिकेशन त्यांच्याच सरकारच्या काळात काढण्यात आले आणि जनगणना न करता काढण्यात आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे ते आरक्षण रद्दबातल ठरवले. 

मी विधानसभेचा अध्यक्ष असताना ओबीसीच्या जनगणनेसाठी मी स्वतः ठराव आणला होता. इतिहासातील ही पहिली घटना आहे. हा नवीन पायंडा आम्ही तेव्हा पाडला आणि जनगणना किती आवश्‍यक आहे, याची जाणीव आम्ही करून दिली होती. तेव्हा तर हा निकालाही आला नव्हता. आता हेच लोक आरोप करत आहेत की नाना पटोलेंना ओबीसींचे देणेघेणे राहिलेले नाही. त्यामुळे हे भाजपवाले किती दुतोंडी आहेत, हे लक्षात येते, असेही नाना पटोले म्हणाले. 

काँग्रेसने कट रचून ओबीसी आरक्षण कमी केल्याचा आरोप विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी केला आहे. ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खानविलकर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. याबाबतची मागणी याचिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मतदारसंघातील कॉंग्रेसचे जिला परिषद सदस्य व भंडारा जिला परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केल्याचा गंभीर आरोप डॉ. फुके यांनी केला आहे.

हेही वाचा : अशोक चव्हाण यांच्या अंगावर फेकली शाई, अन् चतुर्वेदी झाले होते निलंबित...

एकीकडे ओबीसीच्या नावाखाली मते घ्यायची, मोठे मोठे मोर्चे काढायचे, आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षड्यंत्र रचून ओबीसी आरक्षण मिळू द्यायचे नाही, हा काँग्रेस पक्षाचा ढोंगीपणा असल्याच्या आरोप त्यांनी केला आहे. ओबीसी मंत्रालय काँग्रेसकडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. त्यावेळी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपले तोंड का उघडत नाहीत? काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल तर हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे? असा सवालही डॉ. फुके यांनी विचारला आहे.
Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख