जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात चार कोरोना रुग्ण दगावले - four corona patients died at jawaharlal neharu hospital | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

जवाहरलाल नेहरू चिकित्सालयात चार कोरोना रुग्ण दगावले

सुनील सरोदे
मंगळवार, 13 एप्रिल 2021

दोनच दिवसांपूर्वी मंत्री सुनील केदार यांनी जेएन हॉस्पिटलची पाहणी केली होती. त्यावेळी येथे ऑक्सिजन आणि बेड्सची व्यवस्था करण्याबाबत सांगण्यात आले होते. तत्काळ ऑक्सिजनच्या ६४ बेड्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले होते.

कन्हान (जि. नागपूर) : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषद अध्यक्ष रश्‍मी बर्वे आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कन्हान तालुक्यातील कांद्री येथील वेकोलिच्या जवाहरलाल नेहरू केंद्रीय चिकित्सालयात कोविड सेंटर तयार केले. पण तेथे डॉक्टरांसह आवश्‍यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज सकाळी कोरोनाचे चार रुग्ण दगावले. त्यामुळे तेथील वातावरण चांगलेच तापले आहे. 

जेएन हॉस्पिटलमध्ये ४८ बेड्स आहेत. ऑक्सिजनचे सिलिंडरही मुबलक प्रमाणात आहेत. पण डॉक्टरांचा प्रशिक्षित स्टाफ नसल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आजच दोन डॉक्टरांची नियुक्ती केली होती. पण हे दोन डॉक्टर तेथे पोहोचेपर्यंत जेएन हॉस्पिटलमधील वातावरण चांगलेच खराब झाले होते. दोघे डॉक्टर तेथे पोहोचले पण तापलेले वातावरण बघून कुणालाही आपली ओळख न देता काढता पाय घेतला. तिच स्थिती वेकोलिच्या डॉक्टरांची झाली. नंतर पोलिस प्रशासनाने येऊन स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण दरम्यान वेकोलिचे डॉक्टरही तेथून निसटले. 

काल या रुग्णालयात २९ रुग्णांना भरती करण्यात आले होते. त्यांच्यापैकी अमित भारद्वाज (वय ३०), हुकुमचंद येरपुडे (वय ५७), कल्पना कडू (वय ३८) आणि किरण गोरके (वय ४७) यांचा आज सकाळी ८ ते ९ वाचताच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला जात आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत ही बाब कन्हानचे ठाणेदार आणि प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सुजीत क्षीरसागर यांच्याही लक्षात आला. त्यामुळे त्यांनी नगर परिषदेच्या सीओंना पाचारण केले, पण ते घटनास्थळी आलेच नाहीत. पदाधिकाऱ्यांपैकी कांद्रीचे सरपंच चंद्रशेखर पडोळे उपस्थित होते. 

डॉक्टर्स नव्हते तर कोरोना रुग्ण ठेवले कशाला ?
कांद्रीच्या जेएन हॉस्पिटलमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनची व्यवस्था आहे. पण डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची वानवा आहे. ही परिस्थिती काही नवीन नाही. पण खुद्द मंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षांनी येथे कोविड रुग्णालय सुरू केल्यामुळे हे हॉस्पिटल आता सर्व सुविधांनी सुसज्ज होईल. त्यामुळे लोकांमध्ये आनंद होता. पण त्यांचा हा आनंद दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकू शकला नाही आणि आजच ही घटना घडली. सुविधा पुरविणे शक्य नव्हते, तर या दवाखान्यात कोरोना रुग्ण ठेवले कशाला, असा संतप्त प्रश्‍न लोक विचारत आहेत. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारावा, अन् पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून घ्यावा...

कुठे गेले जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन ?
दोनच दिवसांपूर्वी मंत्री सुनील केदार यांनी जेएन हॉस्पिटलची पाहणी केली होती. त्यावेळी येथे ऑक्सिजन आणि बेड्सची व्यवस्था करण्याबाबत सांगण्यात आले होते. तत्काळ ऑक्सिजनच्या ६४ बेड्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून देण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले होते. पण आज डॉक्टर्स नसल्यामुळेच चौघांची जीव गेला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्‍वासन हवेतच विरले. 

Edited By : Atul Mehere

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख