४३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, अन् उपराजधानी आली दहशतीत…

महापालिकेच्या झोननिहाय अहवालानुसार बुधवारी शहरात ७९७९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ४१६ घरांमध्ये डेंगींच्या अळ्या आढळल्या. सर्वेक्षणामध्ये ताप असलेले १०३ रुग्ण आढळून आले.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

नागपूर : शहरात मंगळवारी एका ४३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर उपराजधानी दहशतीत आली. कारण त्याचा मृत्यू महानगरपालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच डेंगीने झाला असल्याचा आरोप मंगळवारीतील नागरिकांनी केला. आता महानगरपालिकेच्या विरोधात ३ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी चालवली आहे. Citizens are preparing to state agaitation anainst municipal corporation. 

नवी मंगळवारी येथील अशोक निखारे (वय ४३ वर्षे) यांचा मृत्यू झाला. नवी मंगळवारी तलावाला लागूनच मृतकाचे घर आहे. या तलावात परिसरातील सांडपाणी, घाण व कचरा टाकला जात आहे. हा तलाव तसेच परिसराच्या स्वच्छतेसाठी अनेक निवेदने देण्यात आली. परंतु महापालिकेने दुर्लक्ष केले. परिणामी या भागात मलेरिया व डेंगीचा उपद्रव वाढला. प्रभाग ५ मधील या परिसरात आता डेंगीची दहशत असून महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप व्यक्त करीत आपचे प्रभाग संयोजक विजय नंदनवार, युवा आघाडीचे संयोजक योगेश पराते यांच्यासह प्रदीप पौनिकर, रोशन डोंगरे, राज कुंभारे यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला, असा आरोप राज कुंभारे यांनी केला. तलाव परिसरातील घाण स्वच्छ करण्यासाठी अनेकदा सांगितले, पण महापालिका तसेच नगरसेवकही येत नसल्याचा आरोप निखारे यांच्या कुटुंबीयांनीही केला. 

सांडपाणी, कचरा आदींमुळे तलाव दूषित झाला आहे. या परिसरातील नागरिकांना विविध आजाराने ग्रासले आहे. मलेरिया, डेंगीचा प्रकोपही वाढला. मनपाने दुर्लक्ष केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. 
-विजय नंदनवार, परिसरातील रहिवासी. 
 

४१६ घरांमध्ये आढळल्या डेंगीच्या अळ्या 
महापालिकेच्या झोननिहाय अहवालानुसार बुधवारी शहरात ७९७९ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ४१६ घरांमध्ये डेंगींच्या अळ्या आढळल्या. सर्वेक्षणामध्ये ताप असलेले १०३ रुग्ण आढळून आले. २५० जणांच्या रक्ताचे नमुने तर १३ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. एवढेच नव्हे ३०२९ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ३८१ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या पथकाने २९४ कुलरमधून पाणी काढले. ९७७ कुलर्समध्ये १ टक्के तर १५५२ कुलर्समध्ये २ टक्के टेमिफॉस सोल्यूशन टाकले. २०६ कुलर्समध्ये गप्पी मासे सुद्धा टाकण्यात आले.

तरुणच सरसावले फवारणीसाठी...
प्रत्येकच वस्तीत डेंगीची दहशत असून महापालिकेच्या फवारणीची प्रतीक्षा करण्याऐवजी सुरेंद्रगड येथील तरुणाईनेच औषध फवारणीसाठी पुढाकार घेतला. डेंगीपासून बचावासाठी जनजागृती करीत या तरुणांनी दहा दिवसांत एक हजार घरांमध्ये औषध फवारणी केली आहे. सिवेज लाइनची उघडी चेंबर, अपूर्ण नालेसफाई व मोकळ्या भूखंडावर साचलेल्या डबक्यांमुळे सुरेंद्रगड, मानवसेवानगर व गोविंदा गौरखेडे कॉम्प्लेक्स या वस्त्यांमध्ये प्रत्येक पाचव्या घरी डेंगी व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. सुरेंद्रगडचा मोठा भाग हा झोपडपट्टीचा आहे. अरुंद रस्ते व दाटीवाटीचे क्षेत्र असल्याने या भागात मनपाचे कर्मचारी अद्यापही औषध फवारणीसाठी किंवा फॉगिंगसाठी पोहोचले नाहीत. 

महापालिकेची उदासीनता व डेंगीचा वाढता प्रकोप पाहता सुरेंद्रगड परिसरातील तरुणांनीच औषध फवारणी व जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. गेल्या दहा दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून आतापर्यंत एक हजारांवर घरांपर्यंत तरुण पोहोचले. जनहितचे संयोजक अभिजित झा यांच्यासह प्रवीण बैरागी, राहुल उईके, अरुण बैरागी, अमित डागोर, राकेश तिवारी, राहुल बैरागी, राहुल दुबे, रोहित मिश्रा, मुकेश विश्वकर्मा, चंद्रकांत हेडाऊ, भरत दुबे अनेक कार्यकर्ते औषध फवारणी करीत आहेत. 

डेंगी, मलेरियासाठी महापालिकेकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वेक्षण, औषध फवारणीच्या नावावर महापालिका केवळ औपचारिकता पूर्ण करीत आहे. औषध फवारणी व फॉगिंगसाठी मनपाकडे नागरिकांनी अनेकदा विनंती केली. मात्र, सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आम्हीच आपला परिसर डेंगू व मलेरियामुक्त करण्याचा संकल्प केला आहे. 
 -अभिजित झा, संयोजक जनहित. 
Edited By : Atul Meher

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com